पुणे, 29 जुलै : पुण्यात 27 जुलै रोजी एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकनाथ खडसे यांचा जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. दरम्यान, सदर प्रकरणी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आता एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत पोलिसांना काही सवालही केले आहेत.
आज पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे म्हणाले की, 7 जणांची मिळून आदळआपट नसताना, कुठलंही संगीत नसताना, गोंधळ, नृत्य नाही. एका घरात ते 7 जण बसले आहेत. त्यांची पार्टी चालू होती, असं असताना तुम्ही याला रेव्ह पार्टी कसं म्हणू शकता, रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या तरी काय, असा सवाल एकनाथ खडसे यांनी पोलिसांना केला. तसेच याला जर रेव्ह पार्टी म्हणता येत असेल तर पुण्यातच नव्हे, अख्ख्या महाराष्ट्रात, देशात प्रत्येक घरात जर असे 5-6 जण बसले तर त्याला रेव्ह पार्टीच म्हणावं लागेल, या शब्दात एकनाथ खडसे यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे रेव्ह पार्टीची व्याख्या तरी काय आणि रेव्ह पार्टी सांगून बदनाम करण्याचं प्रयोजन तरी काय, असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.
पोलिसांनी याठिकाणी केलेल्या कारवाईचे व्हिज्युअल्स मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आले. पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की, खासगी आयुष्यातील असे व्हिज्युअल्स सगळे समोर दाखवावेत असा सवाल करत पोलिसांनी निव्वळ बदनामीसाठी केलेले हे कृत्य आहे, असा आरोपही त्यांनी केला. पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा, त्यातल्या त्यात महिलांचे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही.
डॉ. प्रांजल खेवलकरांना पहिल्या क्रमांकाचे आरोपी करण्याचं कारण काय. त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्यांच्यावर गुन्हा असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. त्यांच्यावर आतापर्यंत एकही गुन्हा नाही. ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक नावाजलेले नाव आहे.
पोलीस म्हणाले, त्याठिकाणी 2.7 एमएल अंमली पदार्थ सापडले. हा साठा एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला, हे चित्रिकरणात दिसलं. पण त्या मुलीला याबाबत काही माहिती नाही, असं ती म्हणाली. पण प्रत्यक्षात ज्याच्याकडे पर्समध्ये अंमली पदार्थ सापडला, तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला हवा होता आणि इतरांना साक्षीदार करायला हवे होते. मात्र, हे सर्व एकनाथ खडसेंच्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी करण्यात आलेले कृत्य आहे, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.
तसेच आरोपींच्या वैद्यकीय चाचणीत अल्कोहोल असल्याचा अहवाल माध्यमांकडे कसा आला आणि अद्याप अंमली पदार्थांचा अहवाल का समोर आला नाही असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे अंमली पदार्थांच्या अहवाला संदर्भात छेडछाड केली जात असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.