मुंबई : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा वापर करण्यात आला आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना सरकार प्रति फॉर्म 50 रुपये देणार होते. त्यामुळे त्यांना ते पैसे आतापर्यंत मिळालेले नाहीत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत त्यांना ते पैसे सरकार देणार का?, असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेंना विचारला.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान, आमदार रोहित पवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही ज्यावेळी ही योजना सुरू केली त्यावेळी अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्याठिकाणी यासंदर्भातील इन्सेन्टीव्ह देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आणि जवळपास 31 कोटींपेक्षा अधिक जी इन्सेटिव्हची रक्कम आहे, ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला बालविकास अधिकारी त्यांच्याकडे जमाकडे केलेली आहे. आणि जवळपास 26 जिल्ह्यापेक्षा अधिक त्याठिकाणी जिल्ह्यांमधील अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या खात्यात जमा होण्याची सुरुवातही झालेली आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.
कृषी सन्मान योजना ज्या-ज्या शेतकऱ्यांना मिळते, त्यांना लाडक्या बहीण योजनेतून वगळण्यात येणार असल्याच्या प्रश्नावर मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, ज्यावेळी या योजनेचा निर्णय निर्गमित करण्यात आला त्या निर्णयात नमूद करण्यात आलेले आहे की, शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, ज्याचा लाभ लाभार्थी घेत आहेत, यामध्ये 1500 किंवा 1500 पेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नाही. नमो शेतकरी योजनेतील महिलांना 1000 रुपयांचा लाभ मिळत असतो. याची जी 500 रुपयांची कॅपिंग आहे, ही शासन निर्णयात नमूद केलेली आहे की, शासनाचा किमान 1500 रुपयांचा लाभ हा प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळाला पाहिजे.
त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी, ज्या साडेपाच ते सहा लाख आहेत, यांना या योजनेतून वगळण्यात आलेले नाही. फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 रुपये हे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्यामुळे त्यासंदर्भात वगळण्यात आलेले नाही. 20-25 लाखांचा आकडा हा माध्यमांकडून किंवा अफवांच्या माध्यमांतून आलेला आहे. आमच्या विभागाकडून किंवा शासनाकडून तसा कुठल्याही प्रकारचा आकडा दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.