मुंबई, 6 जून : एकीकडे मान्सूनची प्रतिक्षा लागली असताना राज्यातील काही भागात मान्सूनपुर्व पावसाला सुरूवात झालीय. तसेच हवामान विभागाने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, देशातील दक्षिणमधील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला असताना महाराष्ट्रात त्याचे कधी आगमन होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हवामान विभागाने दिला पावसाचा अंदाज –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या दक्षिण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. यामध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच हवामान विभागाने आज आणि उद्या सिंधुदूर्ग जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे.
जळगावात कसे राहणार हवामान –
यंदाच्या उन्हाळ्यात जळगावासह खान्देशात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढता राहिल्याने नागरिक उकाड्यापासून हैराण झाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपुर्वी झालेल्या मान्सूनपुर्व पावसामुळे हवेत मोठा गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या लोकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. दरम्यान, मान्सून पुर्व पावसाला सुरूवात झाली असताना जळगाव जिल्ह्यात देखील आज आणि उद्या मेघगर्जनेसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
मान्सून 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होणार –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात दाखल होणार आहे. तसेच शनिवारी (8 जून) आणि रविवारी (9 जून) रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रविवारपासून पुढील दोन दिवस मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह राज्याच्या अन्य भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview