नवी दिल्ली – राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली. यानंतर आता राज्यात महायुतीचे सरकारही स्थापन झाले आहे आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. तसेच आगामी काळात महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होतील, असे सांगितले जात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांवर आज निर्णय होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात दाखल याचिकेवर 25 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती. मात्र, यावर अद्याप कोणताही निकाल लागलेला नाही, किंवा न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाने पुढील सुनावणी आज 4 मार्च रोजी होणार आहे. दोन्ही बाजूच्या वकीलांनी पुढील सुनावणीसाठी ४ मार्च ही तारीख सुचवली होती. त्यावर न्यायालयाने अनुकूलता दर्शवली.
या याचिकांची सुनावणी झाल्यावर या संदर्भातील निकाल येईल. त्यानुसार राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला पुढील प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील महागनरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे भविष्य असणार आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून पक्षाचे मेळावे व बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ दिलं जात आहे.
या महानगरपालिका निवडणुका प्रलंबित –
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी, जळगाव
या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित –
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा