चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई, 8 जून : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएच्या खासदारांची संख्या बहुमतकाइतकी असल्याने नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन उद्या सायंकाळी राष्ट्रपती भवनात करण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्यात काही मंत्री देखील शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही भाजप खासदारांची नावे मंत्री पदासाठी चर्चित असल्याची माहिती समोर आली आहे.
मंत्री पदासाठी महाराष्ट्रातून चर्चित नावे :
नितीन गडकरी –
नितीन गडकरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. अशी कामगिरी करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील इतिहासातील दुसरे नेते ठरले आहेत. नितीन गडकरी 2014 पासून लोकसभेत खासदार म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. तसेच गडकरी 2014 आणि 2019 च्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषविले आहे. त्यांच्या मंत्रीपदामुळे अनेक विकासकामांना गती मिळाल्याचे बोलले जाते. तसेच यंद ते भाजपचे विदर्भातील एकमेव खासदार बनले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.
पियुष गोयल –
लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा पराभव केला. जवळपास एक लाखाहून अधिक मताधिक्याने त्यांना पाटील यांचा पराभव केला. मोदी सरकारच्या काळात राज्यसभा खासदार म्हणून ते निवडून आले होते. तसेच मंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेले पियूष गोयल हे यंदा मुंबईतील भाजपचे मुंबईतील एकमेव लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
नारायण राणे –
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांचा दारूण पराभव करत उद्धव ठाकरे यांचा गड नेस्तानाबूत केला. नारायण राणे यांनी मोदी सरकारच्या 2019 च्या कार्यकाळात भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांची राज्यसभा खासदारपदी निवड झाली होती. तसेच त्यांना केंद्रात मंत्रीपद देखील मिळाले. यंदा ते लोकसभा खासदार म्हणून निवडून आले असून त्यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागणार आहे.
उदयनराजे भोसले –
उदयनराजे भोसले यांचा लोकसभा निवडणूक 2019 मध्ये सातारा मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. दरम्यान, त्यांची भाजपकडून राज्यसभा खासदारपदी निवड करण्यात आली होती. यानंतर यंदा ते पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा त्यांनी पराभव केला. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील भाजप खासदार आणि मराठा चेहरा म्हणून त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
रक्षा खडसे –
माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे ह्या सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा त्यांनी दारूण पराभव करत दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. दरम्यान, मागच्या सरकारच्या कार्यकाळात भारत पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर तिसऱ्यांदा खासदारपदी विराजमान होत असलेल्या रक्षा खडसे यांची केंद्रात मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview