मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपला सलग 3 वेळा ज्यांच्या नेतृत्त्वात 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यातील भाजपचे सर्वात शक्तिशाली नेते म्हणून पाहिले जाते. तर दुसरीकडे भाजपमध्ये 75 वर्षांनंतर त्यांच्या पक्षातील कोणीही सक्रिय राजकारणात राहू शकत नाही, असा नियम असल्याचे बोलले जाते. 75 वर्षे पूर्ण केल्यामुळे गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तर दुसरीकडे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर्षी वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहेत. त्यामुळे 2029 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण असा प्रश्न नेहमीच चर्चिला जातो.
यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वय आणि त्यांची राजकीय कारकिर्दीचा यशस्वी आलेख पाहता ते दिल्लीतील राजकारणात जातील आणि एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागा घेतील, असेही म्हटले जाते. मात्र, यावर आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस या सर्वात देवेंद्र फडणवीस आपल्या स्वत:ला कुठे पाहतात?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं –
यावेळी ते म्हणाले की, 75 वर्षाची मर्यादा मोदीजींनी ठरवली असली, तरी ती पक्षाला मान्य होईलच असं मला वाटत नाही. मोदीजी फिजिकली फिट आहेत. आता ग्लोबल स्टेजवर त्यांनी भारताला नेतृत्त्व दिलेलं आहे. त्यामुळे 2029 सालीही मोदीजींनीच पंतप्रधान व्हावं, अशाप्रकारची पक्षातली आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही ती लादण्याचा प्रयत्न करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हा पक्षाचा असा कार्यकर्ता आहे की त्याला कुठेही टाका तिथे तो फिट आहे आणि आज देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्रात दिलेली जबाबदारी उत्तमपणे त्याठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न मी करेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या नेत्यांच्या मांदियाळीत आपण मला आणलंत असे म्हणत त्यांनी प्रश्न विचारलेल्या आमदार जयंत पाटील यांचे आभार मानले.
तसेच मला माझ्या क्षमताही माहिती आहेत आणि माझ्या मर्यादाही माहिती आहेत, त्यामुळे मी दिल्लीकडे डोळे लावून बसलो नाही. मी मुंबईत अतिशय खूश आहे. दिल्लीच्या वातावरणापेक्षा मुंबईचं वातावरण उत्तम आहे आणि मुंबईत तुमच्यासारखे मित्र आहेत, ते दिल्लीमध्ये नाहीत. त्यामुळे मी मुंबईतच राहणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा – वर्षा बंगल्यावर कधी राहायला जाणार?, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘ही’ वेळ