मुंबई – राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यात एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या चर्चांना उधाण आलेले असताना आता यावर स्वत: डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यांनी ही भूमिका मांडली.
काय म्हणाले डॉ. श्रीकांत शिंदे –
एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाबाबत स्पष्ट शब्दात खुलासा केला. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार आहे.
माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देतांना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे. माझ्यासंदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्णविराम मिळेल अशी माफक अपेक्षा…’, या शब्दात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपली भूमिका मांडली.
काल काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनीही मांडली होती भूमिका –
डॉ. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, चर्चा अजून सुरू आहे. तुम्हीच आता खूप चर्चा करत असता. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगतो, या सर्व चर्चा आहेत. आता एक बैठक आमची अमित भाईंबरोबर झाली आहे. दुसरी एक बैठक आमची तिघांची होईल आणि त्या बैठकीत खूप साधकबाधक चर्चा होईल आणि त्यातून महाराष्ट्राच्या हिताचा योग्य तो निर्णय होईल, असे कालच त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
maharashtra politics : महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण? हे दोन नेते ठरवणार, नावं जाहीर