सांगली, 3 फेब्रुवारी : अहिल्यानगर येथे झालेली 67 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचानी दिलेल्या निकालानंतर उडालेल्या गोंधळामुळे चर्चेत आहे. डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याला अंतिम सामन्यात पंचांनी बाद केले आणि त्यामुळे ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली.
दरम्यान, पंचांच्या निर्णयानंतर शिवराज राक्षे चिडला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा झाला. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा करत चिडलेल्या शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर ओढली आणि लाथ मारली. यावर डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत शिवराज राक्षेने लाथ घातली ही चूक झाली. पण जो कालच्या सामन्यात पंच होता त्या असल्या पंचाना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे सांगितले.
पै. चंद्रहार पाटील पुढे म्हणाले की, पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो आणि त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही. मात्र, पंचाचा निर्णय वादग्रस्त असून त्यावेळी शिवराज राक्षेने लाथ मारून चूक केली. खरंतर, त्याने पंचाना गोळ्या घालायला पाहिजे होत्या. दरम्यान, मी देखील 2009 साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो, त्यावेळी मी आत्महत्या करण्याच्या विचारात होतो, असेही चंद्रहार पाटील यांनी सांगितले.
नेमकं प्रकरण काय? –
अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पृथ्वीराज मोहोळ विरूद्ध शिवराज राक्षे यांच्यात ही लढत झाली. दरम्यान, डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याला अंतिम सामन्यात पंचांनी बाद केल्यानंतर तो चिडला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा झाला. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा करत चिडलेल्या शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर ओढली आणि लाथ मारली. यामुळे मैदानावर गोंधळ झाल्याचे दिसून आले.