पॅरिस, 8 ऑगस्ट : भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर मोठी बातमी समोर आली आहे. विनेश फोगाटने कुस्तीमधून निवृत्त घेतलीय. आज सकाळी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली.
सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलंय? –
विनेश फोगाटने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आई… कुस्ती जिंकली, मी हरलेय, माफ कर मला, तुझे स्वप्न, माझे धैर्य, सगळे काही संपले आहे, यापेक्षा जास्त ताकद आता माझ्यात राहिलेली नाही. अलविदा कुस्ती 2001-2024. तुम्ही सर्व सदैव माझ्यासोबत असाल, मी ऋणी राहीन.”, असे म्हणत जड अंतःकरणाने विनेशने प्राणाहून प्रिय असलेल्या कुस्तीला अलविदा म्हटले आहे.
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 7, 2024
पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेशचा जिद्दीचा प्रवास –
विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकसाठी क्वॉलिफाय झाली. यानंतर तिने मोठ्या जिद्दीनने अंतिम फेरीपर्यंतची मजल मारली. तिने एकापाठोपाठ एक असे तीन सामने खेळत मोठ्या थाटात अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने तिच्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना 5-0 च्या फरकाने जिंकला. दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळात फायनल सामन्यासाठी पात्र ठरणारी ती पहिली महिला भारतीय कुस्तीपटू ठरली.
अंतिम सामन्यापुर्वी नेमकं काय घडलं? –
ऑलिम्पिकमध्ये कुस्ती या खेळात फायनल सामन्यासाठी पात्र ठरणारी विनेश फोगाट ही पहिली महिला भारतीय कुस्तीपटू ठरली असताना संपुर्ण देशवासियांना तिच्यासह गोल्ड मॅडलची सुवर्ण आशा लागली होती. विनेश अंतिम सामन्याच्या रणांगणात उतरणार त्याच्या काही तास आधीच तिच्यासह भारतीयांना धक्का देणारा निर्णय समोर आला. 50 किलो गटात तिचे वजन सुमारे 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले. यामुळे कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिकमध्ये अपात्र घोषित करण्यात आले. दरम्यान, उपांत्य फेरीत धमाकेदार विजय मिळवूनही विनेशचं ‘गोल्ड’न स्वप्न भंगल्याने तिने कुस्तीमधून निवृत्त होत असल्याचा निर्णय घेतलाय.