ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 7 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आता आणखी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील एका तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. हा अपघात गोराडखेडा गावाजवळ झाला.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अक्षय गणेश राजपूत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील रहिवासी होता. अक्षय राजपूत हा टेंन्ट हाऊसचे काम करायचा. नेहमीप्रमाणे तो आपले काम आटपून पाचोरा येथून खेडगाव नंदीचे या आपल्या गावी परत होता.
यावेळी गोराडखेडा या गावाजवळ त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली असता त्याचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. रात्री 11 ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. यानंतर त्याला स्थानिकांनी पाचोरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कोरोनाकाळात वडिलांचं निधन –
अक्षयच्या कुटुंबाबद्दल माहिती मिळाली असता, त्याच्या वडिलांचे कोरोनाकाळात निधन झाले आहे. तर त्याच्या आईची तब्येतही खराब असल्याने त्या घरीच असतात. तर त्याला एक मोठा भाऊ असून तोही शेतीकाम करतो. तर त्याला एक विवाहित बहीणही आहे. अत्यंत साधारण कुटुंबातून येत असलेल्या या तरुणाचा आता भीषण अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज शोकाकुल वातावरणात मृत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी सुवर्ण खान्देश लाईव्हच्या टीमने पाचोरा पोलीस ठाण्याशी संपर्क केला असता याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांच्यावतीने सांगण्यात आले. तर खेडगाव नंदीचे येथील तरुणाच्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.