लासगाव (पाचोरा), 26 एप्रिल : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील रोहित शांताराम तायडे या तरूणाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परिक्षेत मंत्रालयात क्लर्कपदी निवड झाली आहे. यानिमित्त लासगावच्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्यावतीने रोहित तायडेचा आज 26 एप्रिल रोजी विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी एमपीएसद्वारे मंत्रालय क्लर्कपदी निवड झाल्याबाबत माहिती देत रोहित तायडेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तो म्हणाले की, माझी याआधी सरळसेवेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा रूग्णालायात आरोग्यसेवकपदी निवड झाली. यानंतर अभ्यासातील सातत्य, वेळेचे नियोजन आणि चांगल्या मार्गदर्शकांमुळे एमपीएसद्वारे मंत्रालय क्लर्कपदीपदी निवड झाली आहे.
करिअरमध्ये स्वप्ने पाहत त्याला पुर्ण करण्यासाठी आवश्यक ती मेहनत घेतली पाहिजे. यासाठी परिस्थितीची जाणीव ठेवत अभ्यासात सातत्य, शिस्त आणि चांगल्या मित्रांची निवड करणे महत्वाचे आहे. तसेच एकदा अपयश आले म्हणून खचून न जाता पुन्हा-पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत, असेही रोहित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाला.
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहिले पाहिजे – चंद्रकांत दुसाने
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजचे विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुसाने हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत दुसाने म्हणाले की, रोहितने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर स्पर्धा परिक्षेत यश मिळवले. कोरोना काळात वडिलांचं निधन झाल्यानंतरही रोहितने न खचता करिअरचा मार्ग निवडत एमपीएससीद्वारे क्लर्क पदापर्यंत झेप घेतली.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी देखील रोहितचा आदर्श घेऊन आपल्या आयुष्यात मोठी स्वप्ने पाहली पाहिजे आणि योग्य ते मार्गदर्शन घेऊन ती स्वप्न पुर्ण प्रयत्न करावेत. यासोबतच विद्यार्थींनी सॉफ्ट स्किल्स (उदा. संगणकीय ज्ञान, इंग्रजी संभाषण, इत्यादी) याकडे देखील लक्ष दिले पाहिजे, असे विद्यार्थांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत दुसाने म्हणाले.
रोहितसारख्या विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान – डॉ. वाल्मिक अहिरे
तत्पुर्वी, कार्यक्रमाची सुरूवात करताना जि.प. शाळेचे मुख्याध्यापक डॉ.वाल्मिक अहिरे यांनी प्रस्तावना मांडली. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून गेलेले विद्यार्थी ज्यावेळी मोठं यश प्राप्त करतात. त्यावेळी त्यांची प्रेरणा विद्यार्थ्यांनी घेऊन आपल्या करिअरमध्ये फिनिक्स पक्षासारखी भरारी घ्यावी, यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मराठी शाळेत शिकून एमपीएससीसारख्या परिक्षेत मोठं यश संपादन केल्याने रोहितसारख्या विद्यार्थ्यांचा शाळेला अभिमान असल्याचेही डॉ. अहिरे म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर वैष्णव यांनी केले तर आभार अशोक महाले यांनी मानले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी विस्तार अधिकारी संजीव ठाकरे, सरपंच रामसिंग पाटील, उपसरपंच वाहेद देशमुख, पोलीस पाटील पंजाबसिंग पाटील, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पाटील, राजू तायडे, शाळेतील शिक्षक पद्माकर पाटील, शिक्षका प्रणिता परदेशी, उर्मिला पाटील, ममता सूर्यवंशी, अंगणवाडी सेविका माया सुनिल पाटील, अरूणा राजेंद्र तायडे, कमलबाई झुंबरसिंग पाटील, मदतनीस सरला पंडित तायडे, तिरूणा धोंडू सुर्यंवशी, आरीफा बी. शेख सादीक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.