जळगाव : काल एकीकडे अक्षय तृतीयेचा सण सर्वत्र साजरा केला जात असताना भडगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली. सुट्टीमध्ये मामाच्या घरी आलेल्या एका 15 वर्षांच्या भाच्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये मोठी खळबळ उडाली.
काय आहे संपूर्ण घटना –
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पाटील (वय-15, रा. बाळद, ता. भडगाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. दिपक हा नुकताच नववी उत्तीर्ण होऊन दहावीच्या वर्गात गेला होता. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे तो या उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या लहान भावासह जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे आपले मामा किशोर भानुदास पाटील यांच्याकडे आला होता.
काल शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी सर्व मुले बाहेर खेळत होती. यावेळी तो घरात आला आणि वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. यानंतर दुपारच्या सुमारास त्याची आजी त्याला जेवणासाठी बोलवायला गेली असता खोलीचा दरवाजा आतून बंद होता. यावेळी आजीने इतरांना बोलावले आणि दरवाजा तोडला असता समोर जे दिसलं ते पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. दरवाजा उघडल्यावर स्वप्नील हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. यानंतर तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
काल अक्षय तृतीया असल्याने सर्वत्र गोडधोड जेवणाची तयारी सुरू होती. त्यांच्या घरीही मामाकडे जेवणाची तयारी सुरू होती. आजी त्याला जेवायला बोलवलायला गेली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी 15 वर्षांच्या मुलाच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांसह संपूर्ण गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. अद्याप या आत्महत्येचे कारण समोर आले नसून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.