भुसावळ (जळगाव), 17 फेब्रवारी : राज्यभरात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच भुसावळातून ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. खडका चौफलीजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने पुढे असलेल्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवर असलेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर सुद्धा ट्रक चालकाने गाडी थांबवली नाही आणि ही दुचाकी तब्बल 12 किलोमीटर फरफटत नेली.
पोलिसांनी केली चालकास अटक –
अपघातात ठार झालेले दोघे जामनेर तालुक्यातील असून जितू राठोड आणि प्रकाश उखा तंवर (दोन्ही रा. माधव तांडा, ता.जामनेर) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद टोल नाक्यावर पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत ट्रक पकडण्यात आला आणि चालकास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा : ‘ही लढाई कष्टकरी मराठ्यांची! काहीही करा अन् 20 तारखेपर्यंत निर्णय घ्या’ ; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा