शहादा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहेत. यातच एका 23 वर्षांच्या महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला होता. या महिलेचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला.
आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून या महिलेवर चाकूहल्ला करण्यात आला होता. दरम्यान, काल उपचारादरम्यान, या 23 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दीपाली सागर चित्ते असे मृत महिलेचे नाव आहे. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील मलोणीत हा चाकू हल्ला झाला होता. तेथील वातावरण तणावपूर्ण झाल्याने लागलीच पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला.
नेमकं काय आहे प्रकरण –
मिळालेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास मलोणी भागात दीपाली सागर चित्ते आणि रिज्जू मुस्लीम कुरेशी यांच्यात किरकोळ वाद झाला. तसेच शिवीगाळ झाली. याचा जाब विचारण्यासाठी दीपाली आणि तिचे नातेवाईक गेले असताना तेथे रिज्जूचे पती मुस्लीम हमीद कुरेशी याने रागाच्या भरात दीपालीवर चाकूहल्ला केला. यानंतर दीपालीला उपचारासाठी तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुन्हा दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासाठी 3 जानेवारी रोजी तिला सुरत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रविवारी 5 जानेवारीला दुपारी तिचा मृत्यू झाला.
आरोपींना पोलीस कोठडी –
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने दोन संशयितांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी पोलिसांकडे निवेदन देण्यासाठी मोठा जमाव रात्री उशिरापर्यंत थांबला होता. घटनास्थळी तसेच पोलीस ठाणे परिसरात वाढीव पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज शहाद्यात बंद –
शहादा तालुक्यातील या महिलेच्या हत्येच्या निषेधार्थ आज शहाद्यात बंद पुकारण्यात आला आहे. या तरुणीच्या निषेधार्थ आदिवासी समाज आक्रमक झाला असून शहाद्यात बंद पुकारण्यात आला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.