जळगाव : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक बळकटी मिळावी, येथे येणाऱ्या रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडून ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील 30 प्राथमिक आरोग्य केंद्रे स्मार्ट केली जाणार आहेत. या उपक्रमाला जिल्हा परिषदेकडून सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या जळगाव जिल्ह्यात एकूण 77 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यापैकी अनेक केंद्रांमध्ये बऱ्यापैकी सुविधा आहेत. तर, काही ठिकाणी मात्र अद्यापही रुग्णांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आता ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ उपक्रमामुळे 30 आरोग्य केंद्राचे रुपडे पालटणार आहे. ज्या आरोग्य केंद्राच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत, अशा आरोग्य केंद्राच्या इमारतींची दुरुस्ती केली जाणार आहे.
‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात’ नेमक्या काय सुविधा राहतील?
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्ययावत वैद्यकिय साहित्य, आंतर बाह्य विभाग त्यात राहणार आहे. यासह प्रसूतीगृह व शस्त्रक्रिया गृह, हेल्थ कार्ड, यंत्र सामग्री, ऑनलाईन प्रणाली विकसित करणे, बांधकाम, सुशोभीकरण, संरक्षण भित, निवासस्थाने, हिरकणी कक्ष अशा विविध सुविधा मिळणार आहे. इमारतींची दुरुस्ती, आरोग्य केंद्राच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यासह इतर कामे हाती घेण्यात येणार आहेत.
आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सीएसआर फंडाचादेखील हातभार लागणार आहे. या फंडातून 10 ईसीजी मशिन, एक्सरे मशिन देण्यात येणार आहेत. डिलिव्हरी टेबल, संगणकदेखील उपलब्ध होणार आहे. यासोबतच महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेकडून (Maharashtra Energy Development Agency -MEDA) प्रत्येक स्मार्ट आरोग्य केंद्रावर सोलर सिस्टीम बसविण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील या आरोग्य केंद्रांचा ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रात’ समावेश
जळगाव जिल्ह्यातील स्मार्ट आरोग्य केंद्रांमध्ये अमळनेर तालुक्यातील जानवे, पातोंडा, भडगाव तालुक्यातील पिंपरखेड, कजगाव, भुसावळ तालुक्यातील कठोरा, वराडसिम, बोदवड तालुक्यातील एनगाव, येवती, चाळीसगावमधून वाघळी, उंबरखेड, चोपडा तालुक्यातून अडावद, वैजापूर, धरणगावमधील सोनवद, चांदसर, एरंडोल तालुक्यातून कासोदा, तळई, जळगाव तालुक्यातून नशिराबाद, धामणगाव, जामनेर तालुक्यातून शेंदुर्णी, वाकडी, मुक्ताईनगरातून रूईखेडा, कुन्हा, पाचोऱ्यातून वरखेडी, नगरदेवळा, पारोळ्यातून तामसवाडी, शिरसोदा, रावेरमधून खिरोदा, लोहारा तर यावल तालुक्यातून सावखेडासिम, भालोद या केंद्रांचा समावेश असून या सर्व आरोग्य केंद्रांचा कायापालट होणार आहे.