छत्रपती संभाजीनगर, 31 डिसेंबर : एकीकडे देशभर सर्वत्र सरत्या वर्षाला निरोप दिला जात असताना छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील वाळुज एमआयडीसीत रविवारी मध्यरात्री हातमोजे बनविणाऱ्या सनशाइन एंटरप्रायजेस या कंपनीत भीषण आग लागून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काय आहे संपूर्ण घटना? –
वाळुज एमआयडीसीत रविवारी मध्यरात्री हातमोजे बनविणाऱ्या सनशाइन एंटरप्रायजेसमध्ये भीषण आग लागली. दरम्यान, या आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत कंपनी जळून खाक झाली. आगीत पार्किंगमध्ये असलेल्या गाड्याही जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीतून वाचलेल्या कर्मचाऱ्याने सांगितले की, रात्री एक वाजता कंपनीत आग लागल्याचे समजले. आग लागल्यानंतर इतका धूर झाला की श्वास देखील घेता आला नाही.
सहा कामगारांचा मृत्यू –
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणे शक्य नव्हते. यामध्ये 6 कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर 4 जणांना कंपनीतून सुरक्षित बाहेर पडण्यात यश आले. त्या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.