धुळे, 20 जानेवारी : खान्देश साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य धुळे यांच्यावतीने 6 व्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाला धुळे येथे उद्यापासून सुरुवात होत आहे. 21 आणि 22 जानेवारी असे दोन दिवस हे साहित्य संमेलन चालणार आहे. या अहिराणी साहित्य संमलेनाच्या निमित्ताने दोन दिवस खान्देश वासियांसाठी मोठी मेजवानी असणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. उत्तम कांबळेंची उपस्थिती –
या साहित्य संमेलनाचे संमेलानाध्यक्ष ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक आप्पासाहेब रमेश बोरसे हे आहेत. तसेच या अहिराणी साहित्य संमलेनाचे उद्घाटक म्हणून 84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे हे आहेत. तर स्वागताध्यक्षा म्हणून अश्विनीताई कुणालबाबा पाटील असणार आहेत.
आप्पासाहेब रमेश बोरसे सर यांचे मायबोली योगदान अतिशय वाखाणण्याजोगे आहे. अतिशय तळागाळापर्यंत पोहचून काम त्यांचे सदैंव जोमाने चालू असते.” पुरणपोळी, आप्पान्या गप्पा आणि अनेक वर्तमानपत्रात त्यांचे अहिराणी भाषेतील सदर, लेख प्रसिद्ध आहेत. तसेच खान्देशनी वानगी हे त्रैमासिकही ते चालवतात.
धुळे, जळगांव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्यातील प्रत्येक तालुक्यातील अहिराणी साहित्यिक आणि मायबोली प्रेमी आपपले कार्य आणि योगदान देत आहेत. साहित्य संमेलनाच्या कार्यात स्वतःहून पुढाकार घेत आहे. नाशिक,मुंबई-पुण्यातदेखील मायबोली अहिराणी भाषेत कार्यक्रम आयोजित केले जातात. गुजरात राज्यातही अहिराणी मंडळी जोमदार आहे. तेथेही अहिराणी भाषेत अनेक कार्यक्रम होतात.
#निवतं
सहावं अखिल भारतीय #अहिरानी साहित्य संमेलन #धुये नबठ्ठासले शे 🙏🏻 pic.twitter.com/MWbxYfnJJp
— आम्ही खान्देशी (@KHANDESHI_TADKA) January 16, 2023
ज्येष्ठ साहित्यिक रमेश बोरसे हे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक असून त्यांनी स्तंभ लेखनाच्या माध्यमातून साहित्य लेखनाला सुरुवात केली. कथा, कविता, ललित अशा साहित्य प्रकारातून आपला प्रभाव सोडत त्रेमासिकाची सुरूवात केली. अहिराणी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते सतत धडपडत असतात. त्यांच्या या भाषिक कार्याची पावती म्हणून खान्देशातील सर्व साहित्यिक व भाषा अभ्यासकांद्वारे सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
खान्देश वासियांसाठी मोठी मेजवानी –
धुळे शहरातील हिरे भवन येथे दोन दिवसीय होणाऱ्या ह्या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, स्मरणिका प्रकाशन, पुस्तक प्रकाशन, ग्रंथ प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, प्रकट मुलाखत, चर्चासत्र, परिसंवाद, निमंत्रिताचे कवी संमेलन, कवीकट्टा, खानदेशी लोकधारा, गजल मुशायरा, कथाकथन आदी कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे. तरी सर्व अहिराणी भाषा साहित्यिक, रसिक, भाषिक व विविध बोलीभाषांवर प्रेम करणाऱ्या तमाम खानदेश वासियांना संमेलनास उपस्थित रहाण्याचे आवाहन खानदेश साहित्य संघाच्या वतीने करण्यात आले आहे.