ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा – आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही न खचता, न थकता अत्यंत विपरीत परिस्थितीत अभ्यास करून एका तरुणीने यश कसे मिळवता येते, हे सिद्ध करुन दाखवले आहे. योगिता रवींद्र चौधरी असे या तरुणीचे नाव आहे. योगिता या तरुणीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मंत्रालयीन महसूल सहाय्यक तथा नंदुरबार जिल्हा परिषद येथे कनिष्ठ सहाय्यक या पदांवर निवड झाली आहे. तिच्या या यशानंतर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
योगिता ही पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिच्या मिळवलेल्या या यशानंतर महाविद्यालयीन परिवारातर्फे, माजी विद्यार्थी संघ तथा चौधरी समाजातर्फे तिचा सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गो. से. हायस्कूलचे चेअरमन खलीलदादा देशमुख हे होते.
संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, तसेच मानद सचिव महेश देशमुख, विद्यमान प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी योगिताला पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले. तसेच माजी विद्यार्थी संघाच्या वतीने माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष खलील देशमुख, कार्याध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, तसेच सचिव इतिहास विभाग प्रमुख डॉ. जे. डी. गोपाळ यांनी योगिताला सन्मानित केले.
तसेच चौधरी समाजाच्या वतीने ज्येष्ठ संचालक सतीश चौधरी, शांताराम चौधरी, तसेच धरणगावच्या कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देऊन योगिताचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक एस. एस. पाटील, शांताराम चौधरी, सुनील चौधरी, स्पर्धा परीक्षेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांची समायोजित भाषणे झालीत.
त्यानंतर योगिताने उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी केले. अध्यक्षीय भाषण खलीलदादा देशमुख यांनी केले तर आभार डॉ. सुनीता गुंजाळ यांनी मानले. याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.