वाशिम, 5 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाशिममध्ये कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित सुमारे 23 हजार 300 कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ केला. पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटनही त्यांनी केले, “आमच्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात आणि विकासाच्या प्रवासात मोठी भूमिका बजावली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुंबई मेट्रो लाइन-3 च्या बीकेसी ते आरे जेव्हीएलआर सेक्शनच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानले आभार –
बंजारा समाजाचा समृद्ध वारसा, संस्कृती आणि परंपरांचे दर्शन या संग्रहालयात होणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर संजय राठोड यांनी पुढाकार घेतला आणि अतिरिक्त 100 कोटी रुपये प्रदान करण्यात आले. या प्रकल्पाचे सध्याचे मूल्य 700 कोटी रुपये आहे.
“आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की महायुती सरकार आपल्या कल्याणासाठी काम करत राहील.”उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारच्या बंजारा समाजाप्रती असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच मराठीभाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : NASA मधील एरोस्पेस इंजीनिअर, खान्देशकन्या अनिमा पाटील-साबळे यांची मुलाखत