जळगाव, 29 ऑक्टोबर: ग्रामपंचायतीच्या कामकाजात नियमितता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखण्याच्या दृष्टीने कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध जिल्हा परिषद प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. जळगाव तालुक्यातील धानवड ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली असता विनापरवानगी गैरहजर आढळून आलेले ग्रामपंचायत अधिकारी सुनील सरदार यांच्याविरुद्ध जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कठोर कारवाई –
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि जळगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे यांनी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी धानवड ग्रामपंचायती सह जळगाव तालुक्यातील काही गावाना सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी अचानक भेट दिली होती. या भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळून आले.
तसेच ग्रामपंचायत अधिकारी सुनील सरदार हे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. शासकीय कर्तव्याप्रती असलेली ही अनियमितता गांभीर्याने घेत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी त्यांच्याविरुद्ध थेट निलंबनाचे आदेश जारी केले.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा –
ग्रामपंचायत हे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा पुरविणारे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय नियमितपणे सुरू राहणे, नागरिकांची कामे वेळेत होणे आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. नागरिकांना शासकीय कामांसाठी विनाकारण हेलपाटे मारावे लागू नयेत, या दृष्टीने या कारवाई ला महत्व प्राप्त झाले आहे.
यापुढेही अचानक तपासणीदरम्यान विनापरवानगी गैरहजर आढळणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिला आहे.






