मिलिंद वाणी, प्रतिनिधी
चोपडा, 8 ऑक्टोबर : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असताना चोपडा तालुक्यातून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. बस आणि कारच्या झालेल्या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून या दुर्दैवी घटनेत दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. कारमधील वाणी कुटुंब यावल तालुक्यात असलेल्या मनू देवीच्या दर्शनासाठी येत असताना चोपड्यापासून पाच किलोमीटरवर असलेल्या सूतगिरणीजवळ हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा-नाशिक ही शिवशाही बस चोपडा बस आगारातून सकाळी 6 वाजता निघाली. दरम्यान, चोपड्यापासून काही अंतरावर असलेल्या सूतगिरणीजवळ समोरून येणाऱ्या कार आणि ह्या शिवशाही बसमध्ये जोरदार अपघात झाला. यावेळी कारमधील तिघांचा जागेवर मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शैलेश श्रीधर वाणी (वय 34), निलेश श्रीधर वाणी (30) आणि जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय 47) असे मयतांची नावे आहेत. यामध्ये शैलेश आणि निलेश हे सख्खे दोघं भाऊ होते. तर ओंकार खोंड हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज युट्यूब चॅनल लिंक –
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews/videos
देवदर्शनासाठी जाताना काळाची झडप –
सदर अपघातातील मयत आणि जखमी सर्व धुळे जिल्ह्यातील निजामपूरचे मूळ रहिवासी असून सध्या नाशिक येथे राहत होते. नाशिकहून सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ते निघाले होते. यावल तालुक्यातील मनुदेवी येथे नवरात्रोत्सवानिमित्त ते दर्शनासाठी जात होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मदतकार्य केले आणि जखमी प्रवाशाला चोपड्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातासंदर्भात गुन्हा नोंदवित पुढील तपासास सुरूवात केली. दरम्यान, या घटनेने परिसरात मात्र एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.