पाचोरा, 22 जानेवारी : पाचोरा तालुक्यातील वडगाव कडे याठिकाणी त्रितपपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला. दिनांक 13 जानेवारी 2023 ते 20 जानेवारी 2023 पर्यंत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. संगीतमय श्रीमद्भागवत कथा, काकडा, हरिपाठ आणि राष्ट्रीय कीर्तनकार यांचे रात्री नऊ ते अकरा किर्तन, असे या सोहळ्याचे स्वरुप होते.
यावेळी प्रत्येक कीर्तनकारांचा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना स्वामींची प्रतिमा, शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. आठव्या दिवशी पांडुरंगाची पालखी आणि काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली.
या सप्ताहामध्ये हजारो भाविकांनी किर्तन श्रवणाचा लाभ घेतला. सांगतेच्या दिवशी पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील, जि.प. सदस्य मधु काटे, अशोक दादा, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन भाऊ, सरपंच अतुल पाटील, पोलीस पाटीला सुनील भाऊ, संदीप पाटील, पोलीस पाटील सुनिल काटे तसेच श्री स्वामी समर्थ सेवेकरी वर्ग, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, वारकरी, टाळकरी विणेकरी, आणि ग्रामस्थ मंडळी यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
तसेच वारकरी शिक्षण संस्था सोयगाव येथील विद्यार्थ्यांना प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले. आठ दिवस गावामध्ये दिवाळीचे वातावरण होते, असा अनुभव याठिकाणी सर्वांनी घेतला आणि आनंदमयी वातावरणामध्ये सप्ताहाची सांगता झाली.