चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 27 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आला. तसेच सर्वांत आधी खलबतं सुरू झाली ती जागावाटपासाठी. महायुती असो वा महाविकास आघाडी या दोन्हींमध्ये अद्यापही पुर्ण जागावाटप झालेले नाही. मात्र, अशी काही मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी जाहीर झालेल्या जागावाटपामुळे बंडखोरीस सुरूवात झाली आहे.
महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गट) तसेच इतर घटक पक्ष यांची युती आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच इतर घटक पक्ष यांची आघाडी आहे. राज्यात 2022 साली झालेल्या सत्तांतरानंतर अभूतपुर्व राजकीय बदल पाहायला मिळाले. तीन-तीन मोठे पक्ष महायुती तसेच महाविकास आघाडीत एकत्र आल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीचा सर्वात मोठा मुद्दा होता तो म्हणजे जागावाटपाचा. कुठेही वाद न निर्माण होता, जागावाटप करून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान महायुती तसेच महाविकास आघाडी समोर आहे. असे असतानाही काही ठिकाणी जागावाटप झाल्यानंतर आता त्याठिकाणी बंडखोरी होण्यास सुरूवात झाली आहे.
महायुतीत जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर चार मतदारसंघात भाजपमधील नेत्यांनी बंडखोरी केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये एरंडोलमधून ए.टी. पाटील, जळगाव शहरमधून डॉ. आश्विन सोनवणे, अमळेनरमधून शिरीष चौधरी आणि पाचोऱ्यातून अमोल शिंदे यांनी भाजपच्या वाटेला मतदारसंघ न आल्याने, तिकीट मिळाले नसता अपक्ष निवडणूक लढविण्याचे घोषित केले आहे. एकंदरीतच भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असल्याने त्यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील उमेदवारांसमोर आव्हान उभे केले आहे.
जळगाव जिल्ह्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून झालेल्या जागावाटपाचा जर विचार केला तर सर्वप्रथम भाजपने त्यांच्या वाटेला आलेल्या पाचही मतदारसंघापैकी चार मतदारसंघात विद्यमान आमदारांना संधी दिली तर एका मतदारसंघात नव्या चेहऱ्याला उमेदवारी घोषित केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाकडे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हा एकच मतदारसंघ वाटेला आल्यानंतर त्यांनी विद्यमान आमदार तथा मंत्री अनिल पाटील यांना पुन्हा संधी दिली. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्यावतीने 22 ऑक्टोबर रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये त्यांच्या वाटेला आलेल्या पाचही विधानसभा मतदारसंघापैकी तीन विद्यमान आमदारांचे तिकीट कायम ठेवले. यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. तर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच आमदार चिमणराव पाटील यांच्याऐवजी अमोल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महायुतीतील जळगाव जिल्ह्यातील जागावाटप पुर्ण झाल्यानंतर शिवसेनेच्या वाटेला आलेल्या मतदारसंघात भाजपमधून बंडखोरीस सुरूवात झाली. खरंतर, लोकसभेला जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघात महायुती म्हणून अभूतपुर्व यश मिळालं. यावेळी शिवसेनेच्या पाचही उमेदवारांनी अगदी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचे भाजप नेते आजही आवर्जून सांगत आहेत. याचाच एक संदर्भ म्हणजे विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यावतीने 23 ऑक्टोबर रोजी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचे समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, शिवसेनेला महायुती म्हणून साथ द्यावी, असे आवाहन खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.
यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबर रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी पाचोऱ्यात निघालेल्या रॅलीत मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, मंत्री गुलाबराव पाटील आमदार मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी भाजप नेत्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांना महायुतीचे आमदार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांच्यासाठी प्रचार करावा अशा सूचना भाजप कार्यकर्त्यांना दिल्या. एकप्रकारे महायुतीत राज्यासह जळगाव जिल्ह्यात युतीच्या धर्माचे पालन करण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत.
दरम्यान, शिवसेना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार असल्याचे निश्चित केले आहे. तसेच ते उद्या 28 ऑक्टोबर रोजी ते अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
पाचोरा-भडगावसह एरंडोल, जळगाव शहर तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघातील घडामोडी पाहता भाजप कार्यकर्ते शिवसेनेच्या आमदारांसोबत तर शिवसेनेचे कार्यकर्ते भाजप आमदारांसोबत कशा पद्धतीने सहकार्य करतात?, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. एकीकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी युती धर्म पाळण्याचे आदेश दिले असताना त्या आदेशाचे पालन वरील मतदारसंघात भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांकडून होते का?, हे विधानसभा निवडणूक निकालावरूनच स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल