मुंबई – ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर असतो, त्याप्रमाणे निवडणुकीत आम्हालाही थर्ड अंपायर मिळाला असता तर अनेक निर्णय बदलले गेले असते. पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही काही करू शकत नाही, अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. आहे. शिवाजी पार्क येथे दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 5 नंबरच्या गेटवर बांधण्यात आलेल्या या स्मारकाचे अनावरण होणार आहे. या स्मारकाला या वर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी ‘अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…’, फक्त इतकी प्रतिकिया एक्स या प्लॅटफॉर्मवर दिली होती. यानंतर राज ठाकरेंनी माध्यमांशीही संवाद साधला नव्हता. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यातच आजच्या कार्यक्रमात त्यांनी विधानसभा निवडणुकीसह राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
दरम्यान, यावेळी कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘जसे तुमच्याकडे क्रिकेट बदलत गेले तसे आमच्याकडेही राजकारण बदलत गेले. तुमच्याकडे अंपायरने आऊट दिल्यावर, तुमच्याकडे थर्ड अंपायर असतो. गेल्या निवडणुकीत आम्हालाही थर्ड अंपायर मिळाला असता तर मला असं वाटतं अनेक निर्णय बदलले असते. वेगळे दिसले असते. पण आमच्याकडे थर्ड अंपायर नसल्याने आम्ही काही करू शकत नाही,’ या शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव –
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारुण पराभव झाला. मनसेने यंदा विधानसभा निवडणुकीत राज्यातील 288 पैकी 125 जागा लढवल्या. मात्र, त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तसेच 2019 मध्ये निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचाही यावेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पराभव झाला. इतकेच नव्हे तर राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचाही माहीम या मतदारसंघातून पराभव झाला. याठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत हे विजयी झाले.
eknath shinde health update : एकनाथ शिंदे आजारी की नाराज?, गुलाबराव पाटलांनी सांगितली सर्व माहिती…