धुळे : खान्देशातील भाविकांना पद्मविभूषण तुलसीपीठाधीश्वर जगद्गुरू श्री रामानंदचार्य स्वामी श्री रामभद्राचार्यजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून राम कथा ऐकण्याची संधी मिळणार आहे. उद्या 1 जानेवारीपासून धुळे शहरात श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या 1 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत दररोज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भाविकांना कथेचा लाभ घेणार आहे.
धुळे शहरात याठिकाणी कथेचे आयोजन
उद्यापासून धुळे शहरात भाविकांना पद्मविभूषण तुलसीपीठाधीश्वर जगद्गुरू श्री रामानंदचार्य स्वामी श्री रामभद्राचार्यजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून राम कथा ऐकण्याची संधी मिळणार आहे. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील खान्देश गोशाळा मैदान याठिकाणी ही कथा होणार आहे. यासाठी भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच 25 ते 30 हजार लोकांची बैठक व्यवस्था व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
कथेच्या प्रारंभी शोभा यात्रा –
दरम्यान, श्रीराम कथेच्या प्रारंभी शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. कथेच्या ठिकाणी आकर्षक शिव त्रिशूल, शिवलिंग, श्रीराम दरबार तसेच श्रीरामांच्या मनमोहक अशा प्रतिमाही साकारण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी कथेच्या परिसरात जवळपास 25 ते 30 सीसीटीव्ही कॅमेरे तसेच पोलिस मदत कक्ष यासह 500 ते 600 स्वयंसेवक मदतीसाठी कार्यरत राहणार आहेत.
दररोज येणाऱ्या भाविकांसाठी चहापानाची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर कथेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सेवेसाठी प्रथम उपचार केंद्र आणि मोबाइल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक संदीप अग्रवाल, कैलास अग्रवाल, भाजपचे जेष्ठ नेते सुभाष देवरे आदींनी दिली. खान्देशात प्रथमच होत असलेल्या या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.