जळगाव, 24 ऑक्टोबर: सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांच्या टिश्यू कल्चर प्रयोगशाळेला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रयोगशाळेतील कामकाज, उपलब्ध यंत्रसामग्री आणि टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे रोपांची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली.
विभागीय वन अधिकारी महेश झांजुर्णे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रयोगशाळेतील कामकाज, रोप निर्मितीची प्रक्रिया, उपलब्ध यंत्रसामग्री तसेच या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करण्याच्या संभाव्यतेबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रयोगशाळेतील कामकाजाची पाहणी करून टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत विविध प्रजातींची जास्तीत जास्त रोपे तयार करण्यावर भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. प्रयोगशाळेतील कामकाज आणि रोप निर्मितीसाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
यानंतर जिल्हाधिकारी यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या मेहरूण येथील रोपवाटिकेस भेट देऊन पाहणी केली. रोपवाटिकेतील कामकाजाचा आढावा घेत त्यांनी जिल्ह्यातील वृक्षलागवड उपक्रमांसाठी आवश्यक रोपांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्याच्या सूचना दिल्या. या भेटीदरम्यान सहाय्यक वनसंरक्षक एस.के शिसव आणि वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. सोनवणे उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून आधुनिक टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार रोपांची निर्मिती वाढविणे आणि जिल्ह्यातील वृक्षलागवड उपक्रमांसाठी आवश्यक रोपे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या भेटीला महत्त्व आहे.






