ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव (पाचोरा) – पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतातील 10 शेळ्या ठार झाल्या. तर 2 शेळ्या जखमी झाल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरीपासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंप्री शिवारातील गट नंबर 60 मध्ये ही घटना घडली.
काय आहे संपूर्ण घटना –
शेतकरी अल्ताफ सिकंदर शहा फकीर यांच्या शेतात ही घटना घडली. अल्ताफ सिकंदर शहा फकीर यांचे शेत हे गावापासून दीड किलोमीटर अंतरावर पिंप्री शिवारातील गट नंबर 60 मध्ये आहे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य हे शेतात असते.
शेतीसोबतच ते जोडधंदा म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय करतात. दरम्यान, परवा 4 जानेवारी शनिवार रोजी पहाटे पाच ते साडेपाच वाजेच्या दरम्यान, त्यांच्या शेळ्यांवर हिंस्र प्राण्याने झडप घातल्याने शेळ्या ओरडायला लागल्या होत्या. त्यामुळे अल्ताफ हे शेळ्यांच्या आवाजाने जागी झाले. मात्र, तोपर्यंत 10 शेळ्या मृत्युमुखी पडलेल्या होत्या.
अंधार असल्याने अल्ताफ शहा यांची पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. मात्र, त्यांनी व त्यांच्या भावाने आरडाओरड केल्याने दोन हिंस्र प्राणी त्यांना उड्या मारत पळताना दिसले. मात्र, अंधारामुळे हे प्राणी नेमके कोणते प्राणी होते, हे त्यांच्या लक्षात आले नाही.
याप्रकरणी वन विभागाकडून या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. तर 10 शेळ्या ठार झाल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे वन विभागाने हिंस्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.
VIDEO – Success Story : वरखेडी येथील भाऊ-बहिणीची सैन्यदलात निवड; एकाच कुटुंबातील 4 भावंडं देशसेवेसाठी सज्ज