नंदुरबार : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या, तसेच लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छळ असह्य झाल्याने विवाहितेने आत्महत्या केली.
काय आहे संपूर्ण घटना –
सेवतीबाई राकेश पाडवी (21) असे मृत महिलेचे नाव आहे. पहिल्या पतीशी फारकत घेऊन आपल्या मुलाशी लग्न करावे म्हणून संशयित आरोपीने विवाहितेचा मानसिक छळ केला. त्यामुळे या छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील माकडकुंडचा पिंपरीपाडा येथे घडली. याप्रकरणी संशयित आरोपीविरोधात धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दावल्या रंगल्या पाडवी (रा. माकडकुंडचा पिपरीपाडा, ता. धडगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनुसार, दावल्या पाडवी हा सेवतीबाई हिला आपली सून करण्यासाठी तिच्या सासू-सासऱ्यांजवळ कायम तगादा लावत होता. सेवतीबाई हिला देखील माझ्या मुलासोबत लग्न कर म्हणून वारंवार सांगत होता. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. दावल्या याने तिच्या सासऱ्याच्या घरी जाऊन दोन ते तीन लाख रुपये घ्या आणि तुमच्या सुनेचे लग्न माझ्या मुलासोबत करून द्या, असे सांगितले होते. अखेर या संपूर्ण प्रकारामुळे खचलेल्या सेवतीबाई हिने आत्महत्या केल्याची फिर्याद तिचा पती राकेश किर्ता पाडवी याने दिली.
या फिर्यादीवरुन दावल्या पाडवी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहे.
हेही वाचा : Bhusawal Crime News : भर चौकात तरुणावर गोळीबार, भुसावळातील हादरवणारी घटना, नेमकं काय घडलं?