कोल्हापूर – जर मंजूर झालेल्या कामातील 49 टक्के निधी टक्केवारी आणि इतर बाबींवर खर्च होत असेल तर कामे गुणवत्तापुर्ण होणार कशी?, असा सवाल माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.
ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्षे टिकली आणि आपली कामं 25 वर्ष टिकत नाहीत, असे म्हणत अजितदादांनी राज्यातील कंत्राटदारांवर संताप व्यक्त केला होता. तसेच अशा कंत्राटदारांना काळ्या यादीतच टाकणार असल्याचेही ते म्हणाले. यावर आता राजू शेट्टी यांनी मंजूर झालेल्या कामाची टक्केवारी मांडत गुणवत्तापुर्ण कामे होणार कशी, असा सवाल अजितदादांना केला आहे.
काय म्हणाले राजू शेट्टी –
राजू शेट्टी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले की, ‘अजित दादा इंग्रजांच्या काळातील कामे 100 वर्षे टिकली आहेत. कारण कदाचित त्यावेळेस टक्केवारी हा प्रकार नसेल. सध्या मंजूर झालेल्या कामातील स्थानिक आमदार /खासदार 10 टक्के संबधित विभागाचा शाखा अभियंता 2 टक्के , उप अभियंता 2 टक्के , कार्यकारी अभियंता 2 टक्के , वर्क ॲार्डर 2 टक्के, बिले काढण्यास 2 टक्के व कार्यालयीन (क्लार्क पासून ते शिपाई खर्च) 2 टक्के, जीएसटी 18 टक्के, ठेकेदार नफा 10 टक्के जर मंजूर झालेल्या कामातील 49 टक्के निधी टक्केवारी आणि इतर बाबींवर खर्च होत असेल तर कामे गुणवत्तापुर्ण होणार कशी?
ही तुमच्या बारामतीची नाही तरी महाराष्ट्राची शोकांतीका आहे. बघा जमलं तर. समृध्दी महामार्गापासून ते गेल्या तीन वर्षात राज्यात मंजूर झालेल्या कामांची श्वेतपत्रिका काढा. बरबटलेल्या व्यवस्थेची कारनामे समोर येतील. नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता बदल्यांचं नाही तर बदलाचं राजकारण केले जाईल, असे म्हणून पाया रचला आहे. तुम्ही श्वेतपत्रिका काढत त्यावर शिखर चढवा,’ असे राजू शेट्टी म्हणाले आहेत.
अजित पवार काय म्हणाले होते –
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बोलताना एका कार्यक्रमात गुणवत्तापुर्ण बांधकामे होत नसल्याने संताप व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की, ‘आताच मला एक पत्र दिलं की, आमक्या आमक्या भागातील रस्ताचं काम निकृष्ट दर्जाचं चाललेलं आहे. ब्रिटिशांच्या काळात झालेली कामं 100 वर्षे टिकली आणि आपली कामं 25 वर्ष टिकत नाहीत. कशाला कंत्राटदार कामं घेतात….., यांना काम घ्या म्हणून कोण मागे लागले आहे. करायचं तर चांगलं करा ना. नाहीतर अशांना मी काळ्या यादीतच टाकणार आहे. पुढाऱ्याचं आहे की कुणाचं, मी काही बघणार नाही. मला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. तुम्ही तुमचा नफा कमवा. पण बाकीचं तर काम आम्हाला दर्जेदार करुन द्या’.