मुंबई, 22 जानेवारी : राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने स्थापन झालंय. असे असले तरी महायुती-महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरून राजकीय वातावरण तापलंय. अशातच माजी मंत्री बच्चू कडू यांनी खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कदाचित लवकरच केंद्रात भाजपाबरोबर दिसतील, असे सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.
नेमकी काय बातमी? –
बच्चू माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन ते तीन विधेयक पास होण्यासाठी भाजपाबरोबर अडकून राहिले आहेत. मात्र, त्या दोन ते तीन विधेयकांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कदाचित केंद्रातील भाजपा सरकारला गरज पडणार आहे. दरम्यान, यामुळे राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता टाळता येत नाही, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर –
बच्चू कडू यांच्या विधानावर महायुती सरकारमधील मंत्री आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘बच्चू कडू हे आमचे मित्र आहेत. मात्र, त्याचे हे विधान हास्यास्पद आहे. त्यांचे आडनाव कडू आहे गोड नाही, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे हास्यास्पद विधान करू नये”, असं म्हणत आशिष शेलार यांनी बच्चू कडू यांच्या विधानावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव –
अचलपूर मतदारसंघाचे सलग चार वेळा प्रतिनिधित्व केलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू हे विधानसभा निवडणूक 2024 मध्ये पराभूत झाले. भाजपचे प्रवीण तायडे यांनी त्यांचा दारूण पराभव केला. बच्चू कडू हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. दरम्यान, मंत्री असतानाही त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसोबत गुवाहाटीला जाणे पसंत केले होते. यानंतर त्यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांनी छत्रपती संभाजीराजे तसेच राजू शेट्टी यांनी सोबत घेत महायुती व महाविकास आघाडीच्याविरोधात परिवर्तन महाशक्तीची आघाडी उभी केली होती. याचाच फटका त्यांना या विधानसभा निवडणुकीत बसला असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केले अमोल शिंदेंचे अभिनंदन!, काय म्हणाले?…