मुंबई – बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, त्यांची आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. या निमित्ताने आयोजित जाहीर मेळाव्यात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे –
शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी, शिवसैनिकांना संबोधित करताना आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार, दिघेसाहेबांची शिकवण आणि शिवसेना हा चार अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली आहे, बघा. परवाच रामदास भाईंनी मुलाखतीत सांगितलं, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे.
ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, या सगळ्यांनी निकाल दिला. निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली. धनुष्यबाण आपल्याकडे आला. शिवसेना वाचवण्याचं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम तुम्ही केलंय, असं शिवसैनिकांना संबोधून ते म्हणाले.
म्हणे, जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ. पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला त्यांचा नक्षा उतरवून टाकला याचेही साक्षीदार आपण आहोत. शिवेसना वेगाने पुढे जात आहे.
आता म्हणाले, आता आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार, स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि याठिकाणी जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते. घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते, असं म्हणून निवडणुका जिंकता येत नाही आणि कार्यकर्त्यांची मनंही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरुन काम करावं लागतं, फिल्डवर उतरुन कार्य करावं लागतं. त्यांच्या सुखदुखात समरस व्हावं लागतं. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांची जयंती आहे.
स्मारकात गेल्यावर ते म्हणाले, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, त्यांना आम्ही बोलवणार नाही. पण खरं म्हणजे, जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. कारण बाळासाहेबांचे विचार सोडण्याचे पाप तुम्ही 2019 मध्ये केलं. म्हणून त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर जाण्यापूर्वी त्यांनी नाक घासून माफी मागायला हवी होती. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायी तुडवले, त्यांच्याबद्दल काय अपेक्षा ठेवणार, या शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
हेही वाचा – जळगाव रेल्वे अपघात : 13 जणांचा मृत्यू, 12 जणांची ओळख पटली, संपूर्ण यादी…