मुंबई : दरवर्षी दावोसला जातात. दरवर्षी करार केले जातात. पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक आली या महाराष्ट्रात, याची आकडेवारी कधी दिली आहे का, असा सवालही एकनाथ खडसे यांनी केला. गेल्या 10 वर्षातील आकडेवारी सादर करा, असे आवाहनही त्यांनी केले. दावोसला जातात, पण प्रत्यक्ष गुंतवणूक किती, रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार कुठे आहे, असा सवाल करत या राज्यातील रोजगार केला, येथील उद्योग गुजरातकडे वळवले गेले. या राज्यातील नोकऱ्या संपल्या, अशी टिका विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. 10 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यानंतर काल विधानपरिषदेत आमदार एकनाथ खडसे बोलत होते.
45 हजार रुपयांची तूट आपण कुठून भरुन काढणार? –
यावेळी ते म्हणाले की, दिशाहिन, या राज्याला कोणतीही दिशा न देणारा, गोंधळलेल्या मनस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प, नेमकं या राज्याला कोणत्या दिशेने न्याययंच हे न सांगणारा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राची रचना 1960 मध्ये झाली. या 65 वर्षात पहिल्यांदा 45 हजार 128 कोटीच्या तुटीचा आला. 1980-85 साली अशी स्थिती होती की, 100 कोटी जरी आपण वजा झालो तर अख्ख्या महाराष्ट्रभर अग्रलेख लिहिले जायचे. या राज्यात काय चाललंय अशी टीका व्हायची. मागच्या वर्षी हा 675 कोटी रुपये तुटीचा होता आणि एका वर्षात 45 हजार तुटीचा अर्थसंकल्प आणि राज्य विकासाच्या दिशेने चाललंय? 45 हजार रुपयांची तूट आपण कुठून भरुन काढणार?, असा सवालही त्यांनी केला. तसेच वर्षभरात ही तूट भरुन काढण्यासाठी तुम्हाला किती कर लावावे लागतील, किती उत्पन्नाची साधने शोधावी लागतील. असे म्हणत पुढचा वर्षीचा अर्थसंकल्प हा 50 हजार कोटी रुपये तुटीचा राहील, असा टोलाही त्यांनी लगावला.
पुढे ते म्हणाले की, राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे. तुम्हीही कितीही कौतुक केले तरी आज राज्य आर्थिक स्थितीत बुडालेले आहे. तुमच्या तिजोरीत पैसा नाही. अशा स्थितीत तुम्ही वेगवेगळ्या योजना आणत असल्याने महसुली तूट वाढत आहे, पेन्शन, भत्ता, पगार, घेतलेल्या कर्जावरचं व्याज, घेतलेल्या कर्जावरचे हप्ते, यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. हे भरण्यासाठी परत कर्ज काढावे लागते. 8 लाख हजार कोटी रुपयांचं कर्ज तुमच्याकडे आहे. याचं व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत.
रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार कुठे –
दरवर्षी दावोसला जातात. दरवर्षी करार केले जातात. पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक आली या महाराष्ट्रात, याची आकडेवारी कधी दिली आहे का, असा सवालही एकनाथ खडसे यांनी केला. गेल्या 10 वर्षातील आकडेवारी सादर करा, असे आवाहनही त्यांनी केले. दावोसला जातात, पण प्रत्यक्ष गुंतवणूक किती, रोजगाराचे आकडे सांगितले जातात पण रोजगार कुठे आहे. या राज्यातील रोजगार केला, येथील उद्योग गुजरातकडे वळवले गेले. या राज्यातील नोकऱ्या संपल्या, असेही एकनाथ खडसे म्हणाले.
सरकारमध्ये असताना निदान एस, एसटी, ओबीसी, एनटीच्या जागा भराव्या लागत होत्या. पण त्यात रिलायन्सचे उद्योग आले, अंबानीचे उद्योग आले, अडानीचे आले, यामध्ये एकतरी मागासवर्गीयाला प्राधान्य आहे का, असा सवाल करत खासगीकरणाकडे वळल्यावर तुम्ही मागासवर्गीयांच्या नोकऱ्या घालवल्या, असा आरोपही त्यांनी केला.
विकासासाठी रस्त्यांची गरज आहे. पण यासाठी जो पैसा दिला जातो, जमिनी संपादन केल्या जातात. यामध्ये किती शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही संपादित करणार, हजारो एकर शेती, या रस्त्यांच्या कामासाठी तुम्ही घेतात, शेतकरी कधी द्यायला तयार असतात, कधी नाखूश असतात. पण शेतकऱ्याच्या या वडिलोपार्जित जमिनी तुम्ही मातीमोल भावाने घेतात, असेही एकनाथ खडसे म्हणाले.