पाचोरा, 25 मे : ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ पाचोरा शहरात आज 25 मे रोजी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी पाचोऱ्यात सर्वपक्षीय नेते-पदाधिकाऱ्यांसह देशप्रेमींचा तिंरगा रॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी 300 फूट लांबीचा तिरंगा हाती घेत मोठ्या प्रमाणात देशप्रेमींनी रॅलीत सहभाग नोंदवला. दरम्यान, तिरंगा रॅलीत देशप्रेमींच्या ‘भारत माता की जय’च्या उद्गोषाने देशभक्तीचा जागर उसळला.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
तिरंगा रॅली दरम्यान आमदार किशोर आप्पा पाटील पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, पाचोरा तालुक्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सैनिक, डॉक्टर, वकिल, देशप्रेमी तसेच माताबघिनी मोठ्या संख्येने तिरंगा रॅलीत सहभागी झाले. पाचोरा शहरात या तिरंगा रॅलीत फुलांचा वर्षाव करून देशातील सैनिकांचे मनोबल वाढविण्याचे काम शहरातील जनतेने केले.
शहीद जवानाच्या मातेचा तिरंगा रॅलीत सन्मान –
पाचोऱ्यातील तिरंगा रॅलीत नगरदेवळा येथील शहीद जवानाच्या मातोश्री सहभागी झाल्या. म्हणून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याबाबत आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, शहीद जवानाच्या मातेचे पूजन केल्याने भारत मातेचे पूजन केल्याचा भास आम्हाला होतोय. आपला मुलगा देशासाठी शहीद झाला असताना त्यांनी अतिशय स्फूर्तीने या तिरंगा रॅलीत सहभाग नोंदवला म्हणून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
माजी आमदार दिलीप वाघ काय म्हणाले? –
तिरंगा रॅलीबाबत माजी आमदार दिलीप वाघ म्हणाले की, पाचोरा शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या आवाहनानुसार जनतेने उस्त्फुर्त असा सहभाग तिरंगा रॅलीत घेतला असून व्यापारी तसेच कष्टकऱ्यांचा सहभाग असलेली अशी सर्वसमावेशक ही तिरंगा रॅली निघाली. पाचोरा शहरात ज्या मार्गाने ही रॅली निघाली त्या मार्गाने उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिलाय. पाचोऱ्यात तिरंगा रॅलीला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे त्यावरून लोकांचे देशाप्रती असलेले प्रेम उफळून आलेले असून सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा भारताने जो बदला घेतलाय. त्या बदल्यासाठी आजच्या प्रतिक्रियेतून उजळणी झालीय. म्हणून सर्वपक्षीय लोकांनी ठरवल्यानंतर पाचोऱ्यात निघालेल्या तिरंगा रॅली ही भारत मातेच्या ऐकाच्या हा निर्णय असून अशीच एकता भारतात राहील, अशी आशा माजी आमदार दिलीप वाघ यांनी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती –
पाचोऱ्यात आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह, माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधूकर काटे, पाचोरा तालुका शिक्षण सहकारी संस्थेचे चेअरमन संजय वाघ, माजी जि.प. सदस्य पदम पाटील, भाजपचे नंदु सोमवंशी, शिवसेनेच्या पाचोरा तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा मंदाकिनी पाटील, सुमित पाटील, माजी सैनिक, सर्व पक्षीय पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच देशप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.