ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 25 जून : अवकाळी पाऊस व प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झालेले आहे. यात भर म्हणजे शेतीमालाला योग्य भाव नसेल तर शेतकरी फार मेटाकुटिला येत आहे. यासाठी पर्यायी उपाय योजना म्हणून पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने कृषी पणन मंडळ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्याचा निर्णय घेतलेला होता. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु केलेली आहे.
सभापतींनी केले महत्वाचे आवाहन –
बाजार समितीच्या शेतमाल तारण कर्ज योजनेमध्ये 180 दिवसांसाठी शेतीमालाच्या एकूण किंमतीवर 70% कर्ज वार्षिक 6% दराने वखार महामंडळ यांच्या पावतीवर दिले जाते. त्यामुळे आपला शेतीमाल सुरक्षित ठेवण्याकरिता तसेच वाढत्या बाजार भावाचा फायदा होण्यासाठी शेतीमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील उपसभापती प्रकाश अमृत पाटील व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतमाल तारण कर्ज योजना प्रकर्षाने राबविण्याचा निर्णय घेतला असून पाचोरा येथील शेतकरी अनिल विश्वासराव पाटील यांना शेतमाल तारण कर्ज योजनेतून 2 लाख रूपयांचा धनादेश बाजार समितीचे सभापती गणेश भिमराव पाटील यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला. यावेळी संचालक प्रकाश शिवराम तांबे, विजय कडू पाटील , युसुफ भिकन पटेल, सचिव बी.बी. बोरुडे, उपसचिव प्रतिक रमेश ब्राम्हणे, कर्मचारी वसंत चैत्राम पाटील व कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा :






