चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमडंळाच्या पावसाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. आज या अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आंदोलन केले. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी यावेळी विरोधकांनी केली. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे सर्वच नेते याठिकाणी पाहायला मिळाले. तीन पक्षाचे सरकार, महाराष्ट्र करतंय भकास आणि एकच जिद्द गरज नसलेला शक्तीपीठ रद्द अशा प्रकारचे बॅनर यावेळी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या हातात पाहायला मिळाले.
सतेज पाटील, अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, अभिजित वंजारी, यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या आंदोलनात समावेश होता. शक्तीपीठ मार्ग रद्द करावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.
काय आहे शक्तीपीठ महामार्ग?
वर्ध्यातील पवनारपासून ते पत्रादेवीपर्यंत जाणारा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा तब्बल 802 किलोमिटरचा सहा पदरी महामार्ग आहे. हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. सरकारच्या योजनेनुसार विदर्भातील वर्ध्यापासून सुरू होऊन पुढे यवतमाळ, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग असा हा महामार्ग असणार आहे. तो गोव्यातील पत्रादेवीपर्यंत जाईल. सरकारी अधिूचनेत या महामार्गाला नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग असे नाव देण्यात आलं आहे. तसेच तीर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी हा महामार्ग असल्याने या महामार्गाच्या माध्यमातून माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, आंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी. कणेरी, पट्टणकडोली, सिद्धरामेश्वर आदमापूर, पत्रादेवी (गोवा) ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.
दरम्यान, या महामार्गामुळे हजारो शेतकरी भूमीहीन होतील. रस्ते असूनही पुन्हा त्याबाजूने दुसरे रस्ते कशाला हवे, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे शेतकरी या महामार्गाला विरोधक करत आहेत. शेतकऱ्यांची हीच मागणी आता विरोधकांनी लावून धरली असून आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलन केले.