जळगाव, 7 जुलै : राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून, आज सोमवार, 7 जुलै रोजी राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आगामी पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट –
बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळवारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकणात ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत यलो अलर्ट, तर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार तसेच नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार तर जळगाव जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यातील विविध भागात गेल्या दोन-तीन दिवासांपासून समाधानकारक पाऊस झालाय. या पार्श्वभूमीवर शेतीकामांना वेग आला असून पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असताना जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात आज आणी उद्या जोरदार पावासाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हेही वाचा : खोटेनगर–पाळधी रस्त्यासाठी 30 कोटी मंजूर; बायपास पूर्ण होताच काम सुरू होणार






