नवी दिल्ली : जळगाव जिल्ह्याचे सुपूत्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भारताच्या राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपतींकडून एकूण 4 जणांची नियुक्ती करण्यात आली असून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृह, राज्यसभेच्या प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना नामांकित करण्यात आले आहे.
सरकारी अधिसूचनेद्वारे आज रविवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. पूर्वी नामांकित सदस्यांच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेल्या रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर ही नामांकने आली आहेत. यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी संविधानाच्या कलम 80(1)(a) आणि त्याच कलम (3) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांनुसार, उच्च-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणे हाताळण्यासाठी प्रसिद्ध असलेले प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल देवराव निकम, केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, भारताचे माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृह, राज्यसभेच्या प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांना नामांकित केले आहे.
2024 मध्ये लढवली होती लोकसभेची निवडणूक –
विशेष सरकारी वकील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यावर 2024 मध्ये लोकसभेची निवडणूकही लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यानंतर राज्य सरकारच्या वतीने पुन्हा त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर आता त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेत संधी देण्यात आली आहे.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणामुळे उज्वल निकम यांचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजले. या खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासोबतच मुंबईवर झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणात त्यांनी सरकारी वकील म्हणून बाजू मांडली. दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब या दहशतवाद्याला मुंबई पोलिसांनी जिवंत पकडला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात खटला चालला आणि त्याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. कसाबला फासावर लटकावण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.