ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 25 जुलै : पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील दुचाकी चोरीस गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. दरम्यान, पाचोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी गस्तीवर असताना एका संशियतास अटक केली. कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी (वय 23, रा. कजगाव, ता. भडगाव) असे त्याचे नाव आहे. यावेळी त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरण्यात येणारी विविध हत्यारे जप्त करण्यात आली. यासोबतच लासगाव येथील दुचाकी चोरी केल्याची संशियत आरोपीने कबुली दिली.
नेमकी बातमी काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस स्टेशनचे योगेश सुरेश पाटील, शरद मांगो पाटील कमलेश शांताराम पाटील, संदिप पाटील, हरीष कनीराम परदेशी आदी कर्मचारी गस्तीवर असताना, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास 20 जुलै रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास जारगाव चौफली जवळ एक इसम पोलिसांना पाहुन त्याचे अस्तित्व लपवित असताना पळत सुटला. त्याचा पाठलाग करुन पोलिसांनी त्यास पकडले.
घरफोडी चोरी करण्याचे साहित्य आढळल्यामुळे अटक –
यावेळी पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे पाटील यांनी त्यास विचारणा केली असता कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी (वय. २३ वर्षे, रा. कजगांव, ता. भडगांव) अशी त्याची ओळख पटली. दरम्यान, त्याचे कडील बॅगेची तपासणी केली असता त्याचे बॅगेत एक लोखंडी धारधार व अनकुचीदार सुरा, दोन लोखंडी चिमटे, एक लोखंडी टी आकाराचे हत्यार अनकुचीदार, एक लोखंडी कैची असे घरफोडी चोरी करण्याचे साहित्य मिळुन आले. याप्रकरणी त्यास पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये आणत त्याचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास महेंद्र प्रकाश पाटील हे करित आहे.
अन् आरोपीने लासगावच्या दुचाकी प्रकरणाची दिली कबुली –
सदर गुन्ह्याचा तपासा दरम्यान कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी याने पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील मोटार सायकल चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे पुन्हा त्यास अटक करून त्याच्याकडुन 40 हजार रुपये किंमतीची एक हिरो कंपनीची फॅशन प्रो लाल रंगाची मोटार सायकल क्रमांक MH-19 BV-8763 हस्तगत करण्यात आली. या दुचाकी प्रकरणात दोन आरोपी होते. यापैकी कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी यास अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील तपास पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम सलीम शेख हे करीत आहे.
पाचोऱ्यात देखील केली होती घरफोडी –
यासोबतच गुन्ह्याचे तपासाचे दरम्यान चोरी प्रकरणातील आरोपी कुलदिपसिंग सतपालसिंग बावरी याने याने परत पाचोरा शहरातील गिरणा पंपींग रोड येथे एका घरात चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. यामुळे परत त्यास चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास सफौ रणजित देवसिंग पाटील हे करीत आहे.
यांनी केली कारवाई –
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरी योगेश गणगे, सफौ रणजित देवसिंग पाटील, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ योगेश सुरेश पाटील, पोकॉ शरद मांगो पाटील, पोकॉ कमलेश शांताराम पाटील, पोकॉ संदिप पाटील, पोकॉ हरीष कनीराम परदेशी यांनी पार पाडली आहे.
हेही वाचा : कर्तव्यावर असताना हायड्रा वाहनाचा धक्का, सामनेर येथील वाहतूक पोलीस हवालदाराचा नवी मुंबईत दुर्दैवी मृत्यू