नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी बोली सादर करण्याच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रस्तावाला काल मंजुरी देण्यात आली. संबंधित मंत्रालये, विभाग आणि अधिकाऱ्यांकडून आवश्यक हमींसह यजमान सहयोग करार (एचसीए) वर स्वाक्षरी करण्यास आणि बोली स्वीकारली गेल्यास गुजरात सरकारला आवश्यक अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली.
राष्ट्रकुल स्पर्धेत 72 देशांचे खेळाडू सहभागी होतील. यामध्ये स्पर्धेदरम्यान भारतात येणारे खेळाडू, प्रशिक्षक, तांत्रिक अधिकारी, पर्यटक, माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी होणार असून त्यामुळे स्थानिक व्यवसायांना फायदा होईल तसेच महसूल निर्माण होईल.
अहमदाबाद हे जागतिक दर्जाचे स्टेडियम, अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि उत्साही क्रीडा संस्कृती असलेले आदर्श यजमान शहर आहे. जगातील सर्वात मोठे स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमने 2023 च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्याचे यशस्वी आयोजन करून आपली क्षमता आधीच दाखवून दिली आहे.
खेळांव्यतिरिक्त, भारतात राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केल्याने पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार निर्माण होतील तसेच लाखो तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल. याशिवाय क्रीडा विज्ञान, कार्यक्रम संचालन आणि व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स आणि वाहतूक समन्वयक, प्रसारण आणि माध्यमे, माहिती तंत्रज्ञान आणि संप्रेषण, जनसंपर्क आणि संप्रेषण तसेच इतर क्षेत्रातील व्यावसायिकांनाही मोठ्या संख्येने संधी मिळतील.
अशा जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन केल्याने राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना निर्माण होईल. यामुळे एक सामायिक राष्ट्रीय अनुभव मिळून आपल्या राष्ट्राचे मनोबल वाढेल. यामुळे खेळाडूंच्या नवीन पिढीला खेळात करिअर करण्याचा पर्याय स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल आणि सर्व स्तरांवरील खेळांमध्ये अधिक सहभाग घेण्यास प्रोत्साहन मिळेल.