जळगाव, 30 ऑगस्ट : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-जास्त होताना दिसून येत आहे. असे असले तरी जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. अशातच जिल्ह्यात आणखी पुढील चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून मध्यम ते मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज –
राज्यात सध्या गणेशोत्सवामुळे उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मुंबई, पुणे, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. दरम्यान, ऐन सणासुदीच्या काळात पावसाने धूमाकूळ घातलाय. वातारणात झालेल्या अचानक बदलमांमुळे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून येत्या 24 तासांत कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच या भागात वारे ताशी 40 किमी वेगाने वाहणार असल्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झालाय. दरम्यान, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यात पुढील चार दिवस मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आहे. यासोबतच काही भागात ढगाळ हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.






