मुंबई, 2 ऑगस्ट : मुंबईतील आझाद मैदानावार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते. दरम्यान, या आंदोलनाचा आजच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. मराठा आरक्षणासाठीच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी पित त्यांनी हे उपोषण सोडलं आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाल्याचे दिसून आले. उपोषणाची सांगता ही गणपतीच्या आरतीने करण्यात आली. याप्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, प्रशासनातील अधिकारी तसेच मराठा आंदोलक उपस्थित होते.
तत्पुर्वी, आज मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या उपसमितीच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर भेट घेतली. यावेळी शासनाचा मसुदा मनोज जरांगे यांना देण्यात आला होता आणि त्यांनी तो व्यवस्थितपणे वाचला. त्यानंतर उपस्थित असलेल्या आंदोलकांना देखील वाचून दाखवला. यासोबतच त्यांनी मसुदा मंजूर असल्याचे सांगतिले. यानंतर सरकारने मराठा आरक्षणांच्या मागण्यासंदर्भात तीन जीआर काढले. दरम्यान, हे तीन जीआर मनोज जरांगे पाटील यांना दिल्यानंतर त्यांनी त्यांचे आमरण उपोषण सोडले आहे. यानंतर विजयाचा गुलाल उधळत मराठा बांधवांकडून जल्लोषाला सुरूवात झालीय.
मराठा बांधवांकडून जल्लोष –
गेल्या चार-पाच दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव राज्यभरातून मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. मुंबईतील आझाद मैदान, सीएसएमटी रेल्वे स्टेशन, मरीन ड्राईव्ह तसेच मंत्रालय परिसरात मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक दिसून येत होते. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, सरकारचा मसुदा मनोज जरांगे यांनी मंजूर केल्यानंतर सरकार आता जीआर काढण्यात आला आहे. यामुळे मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात येतोय.
View this post on Instagram
उपसमितीसोबतच्या बैठकीत मनोज जरांगेंच्या उपोषणावर तोडगा निघाला –
दरम्यान, मराठा आरक्षणसंदर्भात करण्यात आलेल्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारद्वारे घेण्यात येत असलेल्या निर्णयबाबत उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना अंतिम मसुदा दिला. यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेला आंदोलकांच्यावतीने सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे पुढील काही तासातच हैदराबाद गॅझेट, सातारा संस्थान तसेच इतर मागण्यांसंदर्भात असे तीन जीआर काढण्यात आले आहेत.
मनोज जरांगे आणि उपसमितीच्या बैठकीत काय ठरलं? –
- हैदराबाद गॅझेटियर तात्काळ लागू करण्याची मागणी सरकारला मान्य असून आजच्या आज शासन निर्णय जाहीर होणार आहे.
- सातारा संस्थान गॅझेटच्या मागणीवर जलदगतीने निर्णय घेणार असल्याचे उपसमितीने मान्य केले. याबाबत 15 दिवसात कायदेशीर त्रुटींचा अभ्यास करून अंमलबाजवणी केली जाणार असून सरकार याबाबतचा जीआर काढण्यात आला आहे.
- मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्याची मान्य करण्यात आली असून सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत.
- मराठा आरक्षण आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबियांना 15 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला असून कुटुंबियातील एका व्यक्तीला राज्य परिवहन मंडळ, महावितरण तसेच एमआयडीसीत नोकरी देण्यात येणार आहे.
- 58 लाख कुणबीच्या नोंदी ग्रामपंचायतमध्ये लावण्यात यावी, ही देखील मागणी मान्य करण्यात आली आहे.
- ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या तसेच सगेसोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगे यांच्यावतीने करण्यात आली होती. यावर गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करुन कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचा प्रस्ताव सरकारने दिलाय.
- जातवैधता प्रमाणपत्रासाठी जेवढे दाखले आले ते तातडीने द्या, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच आता मनुष्यबळ त्याला दिलं असून जलदगतीने काम होणार आहे.
मनोज जरांगेंच्या ‘या’ मागणीसाठी सरकारने मागितला वेळ –
मनोज जरांगे यांची मोठी मागणी होती ती म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहेत. मात्र, या मागणीवर तूर्तास निर्णय घेण्यात आलेला नाही. ही प्रक्रिया किचकट असल्याने त्याला एक-दोन महिन्यांचा वेळ द्या, अशी मागणी उपसमितीने मनोज जरांगे यांच्याकडे केली आहे. यामुळे मनोज जरांगे यांनी आंदोलकाच्यांवतीने सरकारला वेळ दिलाय. यासोबतच सगेसोयरेचा निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी मनोज जरांगेंची होती. मात्र, 8 लाख चुकीच्या नोंदी असल्याने त्याबद्दल वेळ लागणार असल्याचे सरकारच्यवतीने सांगण्यात आलंय.