जळगाव, 5 सप्टेंबर : जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोटारसायकल चोरी प्रकरणी मध्यप्रदेशातील एका सराईत आरोपीला अटक केली आहे. विनेश चंपालाल बरडे (वय ३०, रा. अंजनगाव, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश. सध्या रा. चिंचोली, कुसुंबा पेट्रोलपंप जवळ, जि. जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयीन परवानगीनंतर पोलिसांनी चोरी गेलेली दुचाकी हस्तगत केली आहे.
नेमकं प्रकरण काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी CCTNS क्र. 254/2025 भा.दं.सं. कलम 379 प्रमाणे मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तपासादरम्यान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, विनेश चंपालाल बरडे हा चोरी केलेल्या दुचाकीसह फिरत आहे. संशयित आरोपी मेंहदी रंगाचा शर्ट आणि निळ्या जिन्समध्ये डि मार्टजवळ उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
दोन दिवसांची पोलीस कोठडी
सदर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस नाईक शरीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. न्यायालयाकडून आरोपीचा दोन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यानंतर त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस कर्मचारी महेश महाजन, नरेश सोनवणे, शरीफ शेख, तेजस मराठे, अमीतकुमार मराठे, प्रशांत सैदाणे, विकास पहुरकर आणि प्रशांत लाड यांनी केली. या संपूर्ण कारवाईसाठी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.