चोपडा, 17 सप्टेंबर : चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या उत्कृष्ठ, पारदर्शक कामाचा ठसा संपूर्ण नाशिक विभागात उमटवला असून “महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती संघ पुणे” यांनी याची दखल घेऊन जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर महाराष्ट्र राज्यातील नाशिक विभागातून द्वितीय क्रमांकाने चोपडा कृषी बाजार समितीला गौरवण्यात आले.
याबाबत माहिती देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पारदर्शक कामाचा व उत्कृष्ट प्रशासनाचा, शेतकरी हिताच्या निर्णयांचा आणि शेतकऱ्यांसाठी, व्यापाऱ्यांसाठी हमालमापाडी बांधवांसाठी, विविध सेवा सुविधा पुरवून एक उत्कृष्ट सेवा देण्याचे काम केल्याची दखल म्हणून “महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती संघ पुणे” यांनी घेऊन नाशिक विभागात द्वितीय क्रमांकाने तर जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने चोपडा कृषी बाजार समितीला गौरवण्यात आले.
दरम्यान, या संपूर्ण कामाचे श्रेय बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळांनी आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या कुशल, सेवाभावी व पारदर्शक नेतृत्वाला दिले. तसेच बाजार समिती उत्तम चालावी वेळेवर शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय व्हावेत याच दूर दृष्टिकोनातून निर्णय घेण्याबाबतचे मार्गदर्शन व सूचना आमदार सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे सदैव देत आहेत, असेही सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित निकम व घनश्याम अग्रवाल यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असे सांगितले. यावेळी सभापतींनी संपूर्ण संचालक मंडळाचेही सहकार्य असल्याचे सांगितले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची भरभराट पन्नास वर्षाच्या कालावधीत कधी दिसून आले नाही ती आता दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याने सर्वजण या गौरवाबाबत सर्वत्र कौतुक करित आहेत.