मुंबई, 3 ऑक्टोबर : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र येथे पक्ष तर मदत पाठवतच आहे. मात्र, शिवसैनिकांनी याठिकाणी मदत पाठवली पाहिजे. यामुळे जळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने 25 लाख रूपयांची मदत जाहीर करत असून पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही कार्यक्रमानंतर याबाबतचा धनादेश सुपूर्द करू, अशी घोषणा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. मुंबईत पार पडलेल्या दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या वल्गनेसाठी हा दसरा मेळावा नाहीये. सर्वात आधी शेतकऱ्यांना मदत करणे हे आमचं पहिले लक्ष्य आहे. एकनाथ शिंदे यांनी जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या फक्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी घेतल्या. यामुळे मी त्यांचे आभार मानतो.
View this post on Instagram
दरम्यान, खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची, पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांची शेती, पाणीमध्ये गेलेले शेतकऱ्यांची घरे, पाण्यामध्ये वाहून गेलेली पीके यासाठी सरकार तर मदत करतच आहे. मात्र, पक्ष म्हणून आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू अशी मी खात्री देतो, असेही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांनी शिकवलेल्या 80% समाजसेवा आणि 20% राजकारण या तत्त्वाचा उल्लेख यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. दरम्यान, ईर्ष्यावाडी घटनेच्या वेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री असतानाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी धाव घेतल्याचे सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी संजय राऊत यांना भूत म्हणून संबोधत, त्यांना माईक दिसले नाहीत तर त्यांच्या अंगामध्ये चुडेल चढते, अशी टीका देखील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यासह ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.