नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : नवी दिल्लीत केंद्रीय कृषी, कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मुद्द्यावरुन उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी थेट व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरून संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत प्रश्न विचारले.
नेमकी बातमी काय? –
महाराष्ट्रात अलीकडील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांनी सरकार आणि विमा कंपन्यांकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्य सरकारकडून मदतीचे प्रयत्न सुरू असताना, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सिल्लोत्तर गावातील शेतकरी मधुकर बाबुराव पाटील यांच्या खात्यात फक्त 2 रुपये 30 पैसे जमा झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
यासोबतच मधुकर पाटील नावाच्या शेतकरी यांच्या नावावर तब्बल अकरा एकर शेती असून, त्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत केवळ अडीच रुपयांची मदत मिळाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला आहे. त्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय कृषीमंत्री अधिकाऱ्यांवर संतापले –
विशेष म्हणजे, देशभरातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त एक, दोन, पाच किंवा 21 रुपये इतकीच रक्कम जमा झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबत आयोजित केलेल्या बैठकीत या प्रकरणाची माहिती मिळताच मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांना 1, 2, 5 किंवा 21 रुपयांचा विमा भरपाई देणं ही त्यांची उघड थट्टा आहे. सरकार आता अशा प्रकारचं अन्याय प्रकरण पुन्हा घडू देणार नाही, अशा कठोर शब्दांत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना फटकारलं. तसेच त्यांनी, “अशा अल्प रकमेचे पेमेंट कसे आणि का झाले?” याबाबत तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. यासोबतच, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तातडीने आणि एकाच वेळी मिळावी, यासाठी विमा कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले.
चौहान यांनी पुढे सांगितलं की, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीत जेथे आवश्यक असेल तेथे योग्य ते बदल आणि सुधारणा करण्यात याव्यात, जेणेकरून कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही.






