ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 नोव्हेंबर : पाचोरा शहरातील सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स येथे भारतीय जनता पक्षाचा परिवर्तन मेळावा आज 5 नोव्हेंबर रोजी दुपारी पार पडला. जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा पार पडला. यावेळी भाजप नेते, पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी विजयाचा संकल्प करत पाचोरा-भडगामवध्ये 100 टक्के परिवर्तनासाठी निर्धार केला. खासदार स्मिताताई वाघ, चाळीसगाव लोकसभेचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजप जळगाव पुर्वचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी आमदार दिलीप वाघ, अमोल शिंदे, वैशाली सुर्यवंशी, मधूकर काटे यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
राजकारण करण्यापेक्षा विकासाची स्पर्धा करू – आमदार मंगेश चव्हाण
यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी पाचोरा नगरपरिषदेत कमळ फुलवयाचंय, असा विजयी संकल्प करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या टीकेला मंगेश चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत विकासाची स्पर्धा करण्याचे आव्हान दिले. तसेच चाळीसगावमध्ये शिंदेसेनेचा एक तरी नगरसेवक निवडून आणून दाखावावं, असे मंगेश चव्हाण म्हणाले. दरम्यान, पाचोरा-भडगावमधील बलून बंधारे येत्या चार वर्षांत पूर्ण होतील, असेही आश्वासन आमदार चव्हाण दिले.
आगामी निवडणुकीत भाजपची सत्ता मिळवायची आहे – खासदार स्मिता वाघ
पाचोरा-भडगावमध्ये खासदार निधीतून विविध विकासकामे मंजूर करून ही कामे सुरू आहेत. आजच्या मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादावरून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवताना पक्षातील नेत्यांची देखील कसरत होऊ शकते. पक्षातील कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन नगरपालिका, जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जायचंय आणि भाजपची सत्ता मिळवायची, असा विश्वास खासदार स्मिताताई वाघ यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसेल – डॉ. राधेश्याम चौधरी
पाचोरा-भडगावमध्ये भाजपने गद्दारी केली असा आरोप आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केला होता. यावर बोलताना भाजप जळगाव पुर्वचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी म्हणाले की, भाजपचा कार्यकर्त्या हा नेत्याच्या चेहऱ्यावर नव्हे तर पक्षाच्या चिन्हावर काम करतो. म्हणून पक्षावर आरोप करणाऱ्यांना आगामी निवडणूकीत प्रत्युत्तर दिले जाईल. तसेच आमदारांचा विजय हा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वाट्यामुळे शक्य झाला. दरम्यान, जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष बसेल, असा विश्वास डॉ. राधेश्याम चौधरी यांनी व्यक्त केला.
तिघांकडून आमदारांच्या टीकेला प्रत्तुत्तर –
आमदार किशोर आप्पा पाटील यांनी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे तसेच प्रताप पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. दरम्यान, वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे आणि दिलीप वाघ यांनी भाजपच्या परिवर्तन मेळाव्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या टीकेचा समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परिवर्तन होईल आणि जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच पंचायत समितीची सत्ता भाजपकडे असेल, असा विश्वास व्यक्त केला.
पाचोऱ्याची सत्ता आपल्याला काबीज करायची आहे – मधुकर काटे
गल्ली ते दिल्ली आपली सत्ता असून आता पाचोऱ्याची सत्ता आपल्याला काबीज करायची आहे. तसेच जिल्हा परिषदेत पंचेचाळीसहून अधिक जागांवर भारतीय जनता पक्षाचा विजय होईल आणि जळगाव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचा होता आणि येत्या निवडणुकीतही भाजपचाच अध्यक्ष होईल, असे माजी जि.प. सदस्य तथा भाजप नेते मधुकर काट म्हणाले.
यांची होती उपस्थिती –
कार्यक्रमाचे प्रास्तविक दीपक माने यांनी केले. या परिवर्तन मेळाव्यात पत्रकारांच्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या पंढरपूर येथे होत असलेल्या राज्य अधिवेशनाच्या लोगोचे भाजप नेत्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या मेळाव्याला भाजप नेते प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पाटील, माजी जि.प. सदस्य डी.एम. पाटील, संजय वाघ, संजय पाटील, रमेश वाणी, रहिम बागवान, कांतीलाल जैन, अमोल पाटील, भागवत महालपुरे, सुचिताताई वाघ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






