इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 5 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील एका चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. ही घटना ताजी असतानाच आता पाचोरा तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 65 वर्षांच्या वृद्धाने एका 24 वर्षीय गतीमंद तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना पाचोरा तालुक्यात समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना –
पाचोरा तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पिंपळगाव हरे. येथील एका 24 वर्षीय गतीमंद तरुणीचा 65 वर्षांच्या व्यक्तीने विनयभंग केला, अशी फिर्याद पीडित मुलीच्या वडिलांनी दिली. यानंतर पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 204/ 2023 भादवी 354 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला तत्काळ अटक केली आहे. तसेच पुढील कारवाईसाठी त्याला स्थानिक गुन्हे शाखेकडे हजर करण्यात आले, अशी माहिती पिंपळगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी “सुवर्ण खान्देश लाईव्ह”सोबत बोलताना दिली.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका चिमुरडीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरला आहे. ही घटना ताजी असतानाच आता पाचोरा तालुक्यात एका गतीमंद तरुणीचा विनयभंग केल्याच्या घटना समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.