मुंबई, 24 डिसेंबर : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या घोषणेची प्रतिक्षा केली जात होती ती घोषणा आज ठाकरे बंधूंच्या युतीच्या माध्यमातून झाली. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत अधिकृतपणे घोषणा केली. यावरून राज्यभरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे.
राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका –
युतीची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. एक मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ फिरत आहे. त्यात ते अल्लाह हाफीज म्हणत आहेत. यामुळे त्यांनी मला या गोष्टी सांगू नये. मुख्यमंत्र्यांनी बोलू नये अन्यथा माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, असेही राज ठाकरे म्हणाले.
View this post on Instagram
मुख्यमंत्र्यांनी घेतला राज ठाकरेंचा टीकेचा समाचार –
अख्ख्या दुनियेला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला अन् हिंदुत्वातच मरेल. फक्त निवडणुका आल्यावर किंवा मतांच्या राजकारणासाठी भगवी शाल पांघरून आम्ही नाहीत. फक्त मतांसाठी रोज मत बदलणारे आम्ही लोक नाहीत. आम्ही हिंदुत्वादी काल ही होतो आजही आहोत आणि उद्याही राहू. आमचं हिंदुत्व जनतेला मान्य आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.
ठाकरे बंधुंच्या युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? –
मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंवर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने काही मोठे राजकीय चित्र बदलणार आहे, असा कोणाचा समज असेल तर तो अतिशय बालिश आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने मराठी माणसाचा विश्वासघात केल्याचा आरोप करत, त्यांच्या राजकीय वाटचालीचा इतिहास भ्रष्टाचार आणि वैयक्तिक स्वार्थाभोवती फिरणारा आहे. दरम्यान, यावेळी मुंबईकर त्यांच्या भावनिक आवाहनाला भुलणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना–मनसे युतीची खिल्ली उडवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक उपरोधिक उदाहरण दिले. काही वाहिन्या या युतीचे सादरीकरण असे करत असल्याचे त्यांनी सांगितले की, जणू काही रशिया आणि युक्रेन एकत्र येत आहेत. इकडून झेलेन्स्की, तिकडून पुतीन येत असल्याप्रमाणे चित्र रंगवले जात आहे. प्रत्यक्षात, निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, तेच दोन्ही पक्ष करत आहेत. या युतीमागे राजकीय अस्तित्व टिकवण्यापलीकडे कोणताही मोठा अर्थ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकर महायुतीच्या कामगिरीकडे पाहूनच मतदान करतील –
मुंबईकरांचा विश्वासघात करणे, मराठी माणसाला मुंबईबाहेर ढकलण्याचे पाप करणे, असे आरोप करत फडणवीस यांनी म्हटले की, त्यामुळे मराठी समाज या पक्षांच्या पाठीशी उभा राहणार नाही. मुंबईत त्यांच्या सोबत येण्यास कोणीही तयार नाही. निवडणुका जवळ आल्या की भावनिक मुद्दे उपस्थित करायचे, ही जुनी पद्धत असून आता जनता अशा भाषणांना भूल देणार नाही. युतीत आणखी काही चेहरे जोडले तरी मुंबईकर महायुतीच्या कामगिरीकडे पाहूनच मतदान करतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
View this post on Instagram






