जळगाव, 26 डिसेंबर : जळगाव जिल्ह्यात वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचपा बसवण्यासाठी आणि गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 24 डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ (Special Vehicle Checking Drive) राबविण्यात आली. यामध्ये 1 हजार 100 हून अधिक वाहनांवर धडक कारवाई करण्यात आली असून 13 लाख 71 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व वाहतूक शाखांना कडक नाकाबंदी करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने, जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व वाहतूक शाखांनी आपली पथके तयार करून वाहनांची कसून तपासणी केली. या विशेष मोहिमेत प्रामुख्याने विना नंबर प्लेट वाहने (Without Number Plate) आणि अल्पवयीन वाहन चालक (Underage Drivers) यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात 24 डिसेंबर रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ११०६ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण १३ लाख ७1 हजार ४५० रूपयांचा तडजोड शुल्क (दंड) वसूल करण्यात आला आहे. सदर मोहिमेत जळगाव शहर वाहतूक शाखा, भुसावळ शहर, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कारवाईचे वर्गीकरण:
१. विना नंबर प्लेट केसेस (Without Number Plate):
नंबर प्लेट नसलेल्या किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या एकूण ४६३ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४,४५,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
२. अल्पवयीन वाहन चालक केसेस (Underage Driving):
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्या एकूण १०७ अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातून ४,०४,५००/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊ नये, याबाबत पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
३. इतर केसेस (Other MV Act Cases):
इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३६ वाहनांवर कारवाई करून ५,२१,९५०/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.






