जळगाव, 28 डिसेंबर : राज्यातील महानगरपालिकांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पुर्वी, राज्यात ठिकठिकाणी राजकीय पक्षांमध्ये युती-आघाडींचा पेच कायम असताना जळगाव महानगरपालिकेत भाजप, शिंदेंची शिवसेना तसेच अजित दादांची राष्ट्रवादी काँग्रेस हे महायुती म्हणून लढणार आहेत. दरम्यान, जळगाव महापालिकेत महायुतीची घोषणा झाली असली तरी जागावाटपाचा तिढा कायम आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जळगावात मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –
जळगावातील भाजप कार्यालयात काल 27 डिसेंबर रोजी सांयकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाची जळगाव महानगराची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव जिल्हा आणि शहर भाजप तसेच महायुतीचा बालेकिल्ला आहे. जळगाव महानगरपालिकेत 75 जागांपैकी 57 जागा भाजपने जिंकल्या होत्या. या निवडणुकीत वरिष्ठ स्तरावरून महायुती म्हणून निवडणुका लढण्याचे ठरल्याने आम्ही तडजोड करून दोन पावले मागे गेलो. यानंतर आमदार सुरेश भोळे आणि मंगेश चव्हाण यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा झाली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या आणि कोणत्या प्रभागात कुणाला तिकीट द्यायचे हे ठरलेले नाही. रविवार रोजी सकाळी थांबून गुलाबराव पाटील यांच्यासोबत स्वतः चर्चा करून जागावाटपाचा प्रश्न मार्गी लागेल, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
तसेच जागावाटपाबाबत शिवसेनेची 25 जागांची मागणी होती. यानंतर आम्ही त्यांना 15 जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, आता 20 जागांपर्यंत प्रस्ताव आलेला आहे. यामुळे आमच्यात जागावाटपाबाबत फार ताणाताण नसून रविवार-सोमवावरपर्यंत जागावाटपाचा अंतिम निर्णय होणार असून जळगाव महानगरपालिकेत आम्ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ठ केले.
‘नाराजी दूर करण्यासाठी आमच्याकडे औषध!’ –
महायुतीत जागावाटप झाल्यानंतर बंडखोरी तसेच नाराजीनाट्य निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, नाराज कार्यकर्त्यांना आम्ही समजवू. प्रत्येक वेळी निवडणुकीत अशी परिस्थितीत निर्माण होते. मात्र, यावेळी कोणाला एक पाऊल मागे जावे लागते तर कोणाला एक पाऊल पुढे यावे लागते. वेळ त्याच्यावर औषध असते. सुरूवातीला थोडी नाराजी असते दोन-तीन दिवस गेल्यानंतर ती नाराजी दूर होते. कारण आमचा पक्ष हा नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. दरम्यान, नाशिकमधीलही नाराजी दूर झाली असल्याचे ते म्हणाले.
“…जळगाव महानगरपालिकेत महायुती म्हणून लढत आहोत!” –
जळगाव महानगरपालिकेतील महायुतीबाबत पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात भाजपला बहुमत असताना देखील आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून लढलोय. विधानसभेत अभुतपुर्व यश आम्हाला मिळालंय. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून देखील महायुती म्हणून निवडणूक लढण्याचे आदेश असल्याने आम्ही जळगाव महानगरपालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवत असल्याचे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. सदर पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






